News Flash

अराजक टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज!

सध्या पक्षीय राजकारणापेक्षा लोकांनी जगावे कसे हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : करोना ही धोक्याची घंटा असून त्यातून सर्वसामान्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात घेऊन राजकारण-कुरघोड्या थांबवल्या नाही तर देशात अराजक येईल. देश जगला तर आपण जगू हे लक्षात घेऊन या कठीण परिस्थितीमधून सावरण्यासाठी आणि अराजक टाळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत के ले.

महाराष्ट्राच्या पुढील दहा वर्षांतील राजकारणाचा आणि समाजकारणाचा वेध घेण्यासाठी  ‘लोकसत्ता’ने आयोजित के लेल्या ‘दृष्टी आणि कोन’  या दूरसंवादमालेच्या समारोपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, करोनाचे आव्हान, मराठा आरक्षण, देशातील परिस्थिती, शिवसेना-भाजप संबंध, महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्यक्रम अशा विविध विषयांवर मोकळपणाने भाष्य के ले. ठाकरे बंधू एकत्र येणार का या राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जे परमेश्वाराला ठाऊक ते मला कसे कळणार, असे मार्मिक उत्तर त्यांनी दिले.

सध्या पक्षीय राजकारणापेक्षा लोकांनी जगावे कसे हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. सत्ता कशासाठी, हे स्पष्ट नसेल आणि के वळ सत्तालोलुपतेसाठी पाडापाडीचे राजकारण होणार असेल तर लोक विरोधात जातील. लोकांनी मत विकासासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिले आहे. तुमचे राजकीय धंदे तुमच्याजवळ अशी सर्वसामान्यांची रोखठोक भूमिका आहे. करोना ही एक धोक्याची घंटा आहे. सर्व पक्षांनी हे लक्षात घेतले नाही तर अराजक येईल. त्यामुळे देशाला या परिस्थितीमधून सावरण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. राजकारणासाठी युती-आघाडी करण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र येत असतात. मग अशा संकटातून देशाला सावरण्यासाठी एकत्र यायला काय हरकत आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी के ला.

मुख्यमंत्रीपद हे माझे स्वप्न नव्हते. अनेक जण या पदाचे स्वप्न पाहतच राहिले, पण ते मिळाले नाही. मला या पदाची अभिलाषा नव्हती तरी मिळाले. त्यामुळे माझी खुर्ची खेचायची तर खेचा. माझा पिंड राजकारणाचा नसला तरी मी येईल ती जबाबदारी स्वीकारणारा व ती पार पाडणारा आहे. करोनासारखे १०० वर्षांत एखादेवेळी येणारे संकट माझ्या कारकीर्दीत आले आहे. त्याला मी तोंड देत आहे. अशा काळात मदत करणार नसाल तर किमान राजकारण तरी करू नका. अशा काळात पाडापाडी-खुच्र्यांचे उद्योग काय कामाचे, असा टोलाही ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

सी. डी. देशमुख यांचे लवकरच स्मारक 

देशाचे पहिले अर्थमंत्री आणि राज्याचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांचे स्मारक व्हायलाच हवे. पण स्मारक म्हणजे के वळ जयंती व पुण्यतिथीला हार घालण्यासाठीचा पुतळा नव्हे. सी. डी. देशमुख यांनी के लेले कार्य, अर्थमंत्रीपदी त्यांची झालेली निवड किं वा त्यांनी या क्षेत्रात केलेले काम, त्यांचे योगदान यांची यथोचित माहिती नव्या पिढीला देणारे स्मारक व्हावे यासाठी तज्ज्ञ समिती नेमून ते काम करू, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

आता वाचकांना विचारसंधी…

गेला आठवडाभर ‘लोकसत्ता’ने मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलते केले. यात व्यक्त झालेल्या राजकीय नेत्यांच्या दृष्टिकोनाविषयी आपली मते काय हे जाणून घेणे औत्सुक्याचे असेल. जनमनाचा कानोसा घेऊ इच्छिणाऱ्या राजकीय पक्षांसही कदाचित आपली मते-सूचना उपयुक्त ठरतील. आपली प्रतिक्रिया शुक्रवारपर्यंत २०० शब्दांत कळवा.  सुयोग्य आणि प्रचारकी नसणाऱ्या निवडक प्रतिक्रियांना रविवार, १३ जूनच्या अंकात स्थान दिले जाईल. निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक अशा वाद-संवाद-प्रतिवाद या मूल्यांस ‘लोकसत्ता’ किती महत्त्व देतो हे आपण जाणताच! तेव्हा जरूर लिहा आणि loksatta@expressindia.com  या ई-मेल पत्त्यावर पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 2:01 am

Web Title: corona virus political party chief minister uddhav thackeray akp 94
Next Stories
1 मुंबई, ठाण्यात अनेक सवलती
2 गर्दीचा शनिवार
3 लवकरच राणीच्या बागेचे आभासी पर्यटन
Just Now!
X