सर्वच प्रकल्प रेंगाळण्याची भीती; शीव उड्डाणपुलापासून मेट्रोपर्यंत सर्वच कामे लांबणीवर

मुंबई : करोनामुळे जारी करण्यात संचारबंदीमुळे एकीकडे शहरभर शुकशुकाट असताना मुंबईतील पायाभूत सुविधांची कामेही ठप्प झाली आहेत. शीव उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याच्या कामापासून मेट्रोच्या कामापर्यंत सर्वच कामे सध्या बंद करण्यात आली आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कधी नियंत्रणात येईल, याची खात्री नसल्याने ही कामे रेंगाळयाची शक्यता आहे.

सध्या शहर आणि महानगर परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांमार्फत पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत. शीव उड्डाणपूलाचे १६० बेअरिंग बदलण्याच्या कामास १४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाल्यानंतर तीन टप्प्यांत ८० बेअरिंग बदलून झाले आहेत. बेअरिंग बदलण्याचे काम ६ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते, त्यानंतर २० दिवस एक्स्पान्शन जॉईन्ट बदलणे आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार होते. सध्या थांबलेले हे काम पुन्हा सुरू होईल तेव्हा चार दिवसांचे चार टप्पे आणि २० दिवसांचे काम करावे लागेल.

काही ठिकाणी पोलिसांनी काम थांबवण्यास सांगितल्यामुळे काम बंद केल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पातील काम जितके दिवस बंद राहील तेवढा अधिक काळ प्रकल्प पूर्ण होण्यास लागेल असे अधिकाऱ्यानी सांगितले.

मेट्रोच्या एका मार्गिकेवर सुमारे ७००-८०० कामगार कार्यरत असतात. काम बंदच्या काळात एकाही कामगाराचे वेतन कापले जाणार नसून, त्या काळातील वेतनाचा खर्च प्राधिकरणामार्फत केला जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात कंत्राटदारांना सुचना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यालयीन कामकाजात कर्मचारी संख्या कमी केली असली तरी निविदा स्वीकारण्यासारखी ऑनलाईन माध्यमातून होणारी कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कामाचे बहुतांश स्वरुप जरी यंत्रांद्वारे होत असले तरी अनेक ठिकाणी कामगार प्रकल्पस्थळी येऊ न शकल्यामुळे कंत्राटदारांना काम सुरु ठेवणे शक्य नसून ती कामे थांबली असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कामांना फटका? मेट्रो मार्गिका

ल्ल दहिसर (पू) ते अंधेरी (प.) ७, डिएन नगर ते दहिसर २ ए, डिएन नगर ते मंडाले २ बी, समर्थनगर ते विक्रोळी ६, वडाळा ते कासारवडवली ४, कासारवडवली ते गायमुख ४ ए, ठाणे-भिवंडी-कल्याण ५. चारकोप आणि वडाळा येथे कार डेपो. कलानगर ते वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान दोन उड्डाणपूल. शिवडी ते चिर्ले मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, २२ किमीचा मुंबई पारबंदर प्रकल्प.

  •   वांद्रे वर्सोवा सी लिंक.
  •  शिवडी उड्डाणपूल बेअरिंग बदलणे.
  • कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रो