दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ; १ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

मुंबई : करोना संसर्गावर उपलब्ध होणारी लस मुंबईकरांना देताना कोणताही गोंधळ उडू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील तब्बल दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा, तसेच पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ५०० पथके तैनात करण्याचा निर्णय मुंबई महानगर कृती दलाच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. लसीची पहिली मात्रा १० ते १२ दिवसांमध्ये, तर दुसरी मात्रा २१ ते २८ दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी मुंबईकरांना करोनाची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मुंबई महानगर कृती दल’ स्थापन करण्यात आले आहे. लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कृती दलाचे अध्यक्ष आणि अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. पालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल आणि विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता बैठकीस उपस्थित होते.

लसीकरणासाठी कृती दलाप्रमाणेच विभागीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. कांजूरमार्ग येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर करोनाची लस साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असून ही जागा ‘प्रादेशिक लस भांडार’ म्हणून निर्देशित करण्यात आली आहे.

ही लस तीन टप्प्यांमध्ये देण्यात येणार असून त्याबाबत आरोग्य खात्यातील सुमारे २,२४५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पालिका आणि खासगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, एसटी, बेस्ट कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

लसीकरणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून लस घेण्यापूर्वी संबंधितांना ओटीपी क्रमांक दाखवावा लागणार आहे. लसीकरणासाठी नावांची यादी, पत्ता आदी माहिती मागविण्यात येत आहे. विशेष म्हणजे लसीकरणात काळाबाजार होऊ नये यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे.

१ लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात एक लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना नियोजित केंद्रावर लस देण्यात येणार आहे. यासाठी विशेष पथके सज्ज करण्यात येणार असून त्यात दोन परिचारिका, एक बहुउपयोगी कर्मचारी आणि अन्य चौघांचा समावेश असेल. पाच पथकांसाठी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे.