करोनामुळे मार्च ते जूनदरम्यानचे ३८ मुहूर्त वाया; वर्षभरातील ५० टक्के व्यवसायावर पाणी

सुहास जोशी

मार्च ते जून महिन्यांचा कालावधी म्हणजे लग्नसराईचा हंगाम. दरवर्षी या तीन महिन्यांत हजारो विवाहसोहळे पार पडत असतात. मात्र, यंदा करोनाच्या संकटामुळे या तीन महिन्यांतील ३८ विवाहाचे मुहूर्त पाण्यात गेल्यामुळे लग्नसराईशी संबंधित व्यवसायावर अमंगळ छाया पसरली आहे. वर्षभरातील ४० ते ५० टक्के  व्यवसाय याच काळात होत असल्यामुळे त्यावर या वर्षी पाणीच सोडावे लागले आहे.

कमी काळात आणि रोखीत मिळणारे उत्पन्न याची सांगड असल्याने लग्नसमारंभाशी निगडित सर्वच व्यावसायिकांना या मोसमाचा मोठा आधार असतो. मात्र टाळेबंदीच्या काळात सर्वच समारंभांवर बंधने आल्यानंतर या काळातील लग्नसमारंभांना फटका बसला आहे. या वर्षी मार्च ते जून या काळात लग्नाचे ३८ मूहूर्त आहेत, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये १४ मूहूर्त, असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

टाळेबंदी उठल्यानंतरदेखील उर्वरित वर्षांत फारसे समारंभ होतील अशी शक्यता दिसत नसल्याचे केटरिंग व्यावसायिक महेश कदम यांनी सांगितले. एकूणच पैसे खर्च करण्याबाबतचा कल आणि उत्साहाचे वातावरण कमी असण्याची शक्यता ते वर्तवतात. त्यातही समारंभ झालेच तर माणसांची संख्या कमीच राहील, असे त्यांनी सांगितले.

खर्चाचा वाढता विस्तार

लग्नसमारंभाचा खर्च हा हौसेपोटी आणि प्रतिष्ठेपायी होत असल्याने त्यातील कमाल पातळीला कसलीच मर्यादा दिसत नाही. मुंबईसारख्या शहरात सभागृह भाडे आणि सजावट मिळून ५० हजारापासून काही लाखांपर्यंत खर्च केला जातो. खुल्या मैदानातील समारंभासाठी हाच खर्च दोनतीन लाखांपासून पुढे सुरू होतो. किमान ३०० ते ३५० माणसांसाठी जेवणाचा सर्वसाधारण खर्च हा दीड ते दोन लाखांपर्यंत होतो, तर छायाचित्रणासाठी किमान ४० हजारापासून काही लाखांपर्यंत खर्च करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

चातुर्मासातही मूहूर्त पण..

चातुर्मासात लग्नाचे मुहूर्त नसतात, पण या वर्षी पंचांगकर्त्यांनी करोनापूर्व काळातच याबाबत चर्चा करून चातुर्मासातदेखील मुहूर्त दिले आहेत. मात्र या काळात मुंबईसारख्या शहरात पावसाचे प्रमाण खूपच बेभरवशी असते. अशावेळी लग्नसमारंभ आयोजित होण्याबाबत साशंकताच असण्याची शक्यता या क्षेत्रातील व्यावसायिक वर्तवतात.