सर्वोच्च न्यायालयानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही आता मुंबईसह राज्यात ‘करोना’मुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवडय़ात केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या सगळ्या खंडपीठांना हा निर्णय लागू असणार असून उच्च न्यायालय प्रशासनाने शनिवारी एका अधिसूचनेद्वारे निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याची सूचना केंद्र आणि राज्य सरकारने केली आहे. त्याच आधारे प्रभारी मुख्य न्यायमूर्तीनी पुढील आठवडाभर केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे उच्च न्यायालयाच्या महानिबंधक कार्यालयाने अधिसूचनेत नमूद केले आहे. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठासह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठांनाही लागू आहे. या अधिसूचनेनुसार, १६ पासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होईल. तसेच ज्या प्रकरणांमध्ये अंतरिम दिलासा देण्यात आलेला आहे, अशा प्रकरणातील अंतरिम दिलासा या आठवडय़ातही कायम राहील, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

वकील, पक्षकार आणि स्वत:च आपली बाजू मांडणाऱ्या याचिकाकर्त्यांनी सकाळी आपले प्रकरण संबंधित न्यायालयासमोर सादर करावे व त्यावर तातडीने सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे पटवून द्यावे. न्यायालयाला तातडीने सुनावणी घेण्याचे कारण पटल्यास अशी प्रकरणेच ऐकली जातील, असेही उच्च न्यायालय प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.