मिरा भाईंदर शहरात आज तीन नवे करोनाबाधित  रुग्ण वाढले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या 52  झाली आहे. मिरा भाईंदर शहरातील करोना बाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे आढळून येत आहे.

आज  आढळून आलेल्या तीन जणांमध्ये  दीड वर्षाच्या बाळाचा देखील समावेश  आहे. तर,  दिलासादायक बाब  म्हणजे अन्य 3 रुग्ण हे बरे देखील झाल्याने आतापर्यंत शहरात एकूण 5 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. गुरुवारी आढळून आलेल्या अहवालात तिन्ही पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण मिरा रोड येथील नया नगर, पूनम सागर परिसरात आणि भाईंदर येथील गोड देव परिसरात राहतात  अशी माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107  नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 043 वर पोहचला आहे.या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.