रुग्णदुपटीचा कालावधी १०६ दिवस

मुंबई :  करोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून शहरात रविवारी ३,७७५ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. मुंबईत संसर्ग प्रसार वेगाने होत असून रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरात १८६ दिवसांवरून १०६ दिवसांवर आला आहे. रविवारी मुंबईत १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ जण ६० वर्षांवरील होते, तर सात रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

शहरात सध्या २३ हजार ४४८ रुग्ण उपचाराधीन असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. रविवारी १६४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मागील चोवीस तासांत बाधितांच्या संपर्कातील २१ हजार २०८ जणांचा शोध घेण्यात आला आहे. शहरात सध्या ३१६ गृहसंकुले रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित आहेत, तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्टय़ांची संख्या ४० वर गेली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात २,१९५ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात रविवारी गेल्या सात ते आठ महिन्यांच्या तुलनेत रविवारी सर्वाधिक २ हजार १९५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्य़ातील २ हजार १९५ रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात ६३२ रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही ६५२ रुग्ण आढळून आले. जिल्ह्य़ात  एकूण बाधितांची संख्या २ लाख ८८ हजार ४४४ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६ हजार ३८२ इतका झाला आहे.

रविवारी जिल्ह्यातील दररोजच्या रुग्णसंख्येने २ हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६५२, ठाणे महापालिका क्षेत्रात ६३८, नवी मुंबई ४१६, उल्हासनगर १२१, मिरा भाईंदर १२०, बदलापूर ८६, अंबरनाथ ७४, ठाणे ग्रामीण ५० आणि भिवंडीत ३८ रुग्ण आढळून आले. गेल्या सात ते आठ महिन्यांतील जिल्ह्य़ातील ही सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. तर, रविवारी जिल्ह्य़ात पाच जणांचा मृत्यू झाला. यातील ठाणे महापालिका क्षेत्रात दोन, नवी मुंबई दोन कल्याणमधील एका रुग्णाचा सामावेश आहे.

शहरात उच्चांक

ठाणे महापालिका क्षेत्रात यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक ५६४ करोनाबाधित आढळले होते. रविवारी मात्र, ६३२ जणांना संसर्ग झाला. ही उच्चांकी नोंद  आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात यापूर्वी एका दिवसात सुमारे ७०० रुग्ण आढळून आले होते. रविवारी  ६५२ रुग्णांची नोंद झाली.