करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं आता रुग्णालयांमध्ये जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जे संशयीत रुग्ण आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध जागांचा वापर क्वारंटाइन आणि निरिक्षण कक्षांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून वरळीमधील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) डोमचे भव्य अशा क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतरण करण्यात आलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

यापूर्वी प्रो कबड्डी लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी आता ५०० बेडचे क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आलं आहे. जास्तीत जास्त संशयीत रुग्णांची सोय होईल अशा योग्य जागेच्या शोधात महापालिकेचे अधिकारी होते. त्यानुसार त्यांना ही जागा योग्य वाटली. त्यानंतर आम्ही या जागेत क्वारंटाइन सेंटर उभारण्यास परवानगी दिली, अशी माहिती एनएससीआयचे सचिव अतुल मारु यांनी स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितले.

क्वारंटाइन सेंटरसाठी महापालिकेनं या आधीच इथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे गुरुवारपासून हे सेंटर सुरु करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील G वॉर्ड येथील करोनाच्या संशयीत रुग्णांना या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच एनएससीआय सारख्या क्रिडा संकुलामध्ये क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशननं देखील वानखेडे स्टेडियममध्ये अशा प्रकारचे क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी हिरवा कंदिल दाखवला होता.

त्याचबरोबर डोम एन्टरटेन्मेटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियाडवाला यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले की, महापालिकेच्या मदतीनं आम्ही ३०० बेड्ससह प्रमाणित सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन म्हटलं होतं की, “एनएससीआय डोम हे क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक संशयीत रुग्णांचा आम्ही शोध घेतला असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहे. या लोकांनी आता स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी स्वतःला आयसोलेट करुन घेऊन दिलासा देणं गरजेचं आहे.”

एनएससीआय डोम या स्टेडियममध्ये आजवर विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये बॅडमिंटन लीग, प्रो कबड्डी लीग तसेच कॉमेडी गिग्ज आणि लग्न समारंभांसाठी देखील याचा वापर करण्यात आला आहे.