देशात करोनाची स्थिती गंभीर असून महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आहे. महाराष्ट्रातही करोनाचे सर्वाधिक जास्त रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील करोनाची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मुंबईत मंगळवारी करोनाच्या नवीन ८०६ रुग्णांची, तर ६४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी मुंबईतील एकूण मृतांची संख्या ४ हजार ९९९ झाली आहे. मृत्यूचा दर ५.८ वर कायम आहे.

दरम्यान अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी ट्विटरला मुंबईतील एकूण परिस्थितीचा आढावा देणारी माहिती शेअर केली आहे. ही आकडेवारी ६ जुलैपर्यंतची आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत ८५ हजार ३२६ जण करोना पॉझिटिव्ह असून ५७ हजार १५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ४९३५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ३९६४ जणांचं वय ५० हू्न अधिक होते. तर एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३ हजार २३९ असून लक्षण नसणारे १३ हजार ८९८ रुग्ण असून लक्षण असणारे ८३५७ रुग्ण आहेतय यामधील ९८४ जणांची प्रकृती गंभीर आहे.

६ जुलैपर्यंत एकूण ३ लाख ६३ हजार १२० टेस्टिंग करण्यात आल्या असून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण २३.४९ टक्के इतकं आहे. अश्विनी भिडे यांनी यामध्ये किती बेड असून त्यातील किती उपलब्ध आहेत याचीही माहिती दिली आहे. याशिवाय कोविड सेंटर्स तसंच इतर ठिकाणी असणारे बेड तसंच आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची माहितीही देण्यात आली आहे.

१ कोटी ६० लाख १००१ जणांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं असून यामधील ५ लाख ४० हजार ४१९ जण हाय रिस्क तर १ कोटी ६० हजार ६८२ जण कमी रिस्कमध्ये आहेत. क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या १ कोटी ३४ लाख ४०१४ इतकी आहे. सध्या २ लाख ४५ हजार ८६४ जण आपल्या घऱी क्वारंटाइन आहेत. तर ११ हजार २२३ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

यामध्ये एकूण किती कोविड सेंटर्स आहेत तसंच त्या ठिकाणी किती बेड आहेत आणि काय उपलब्धता आहे याचीही माहिती देण्यात आली आहे. मुंबईत सध्या अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन ज्यामध्ये झोपडपट्टी आणि चाळींचाही समावेश आहे त्यांची संख्या ७५० इतकी आहे. ६६०२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. तर कॉल सेंटरवर आतापर्यंत १ लाख ६६ हजार २६ इतके फोन आले आहेत. याशिवाय अश्विनी भिडे यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डप्रमाणेही करोनाबाधित रुग्ण आणि डबलिंग रेटची माहिती दिली आहे.