करोना-टाळेबंदी पर्वात कर्जओझ्याखाली दबलेल्या रिटेल गुरू किशोर बियाणी यांच्यासाठी व्यवसायबंधू मुकेश अंबानी धावून आले. विक्री व्यवहाराद्वारे बियाणी यांच्या ‘फ्यूचर’ समूहातील अनेक किरकोळ व्यवसाय, कंपन्या, मालमत्ता अंबानींकडे गेल्या. मात्र फ्यूचरची भागीदार कंपनी अमेरिकी ई-कॉमर्स अ‍ॅमेझॉनने व्यवहारपूर्तीनंतर खोडा घातला.

वाद काय?

अ‍ॅमेझॉनने फ्यूचर कूपन्स लिमिटेडमधील आपल्या भागीदारीचे कारण पुढे करत फ्यूचर समूहावरील वर्चस्वासाठी दावा केला. फ्यूचर कूपन्समधील भागीदारीमुळे समूह खरेदीसाठी आपला दावा पहिला असल्याचे अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे. फ्यूचरच्या उपकंपनीतील हिस्सेदारीमुळे प्रथम भागीदार असून उर्वरित हिस्सा वा अन्य व्यवसाय खरेदीसाठी ‘नॉन कॉम्पीट’ करारानुसार प्रथम आपल्याला विचारणा होणे आवश्यक आहे, असे अमेरिकी कंपनीचे म्हणणे. तसेच बोलणी फिस्कटल्यास समूहाच्या इतर पर्यायाची कल्पनाही आपल्याला द्यायला हवी होती, असे अ‍ॅमेझॉनने न्यायाधिकरण प्रक्रियेदरम्यान नमूद केले.

कूपन कुठले?

फ्यूचर-अ‍ॅमेझॉन वाद-दावा प्रकरणात कू पनचा उल्लेख वेळोवेळी आला आहे. हे कूपन म्हणजे फ्यूचर समूहाचीच फ्यूचर कूपन्स लिमिटेड ही अन्य उपकंपन्यांप्रमाणे आणखी एक उपकंपनी. समूहातील विविध नाममुद्रेंतर्गत होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीदरम्यान ग्राहकांना भेट, सवलत देणारे हे कॉर्पोरेटीय व्यासपीठ. या उपकंपनीतील ४९ टक्के हिस्सा अ‍ॅमेझॉनने २०१९ मध्ये २,००० कोटी रुपये मोजून घेतला. अ‍ॅमेझॉनच्या एनव्ही इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्जद्वारे झालेल्या या व्यवहारामुळे फ्यूचर समूहाला विविध १,५०० दालनांतील वस्तू सवलतीसह अ‍ॅमेझॉनच्या मंचावर विकण्याची सोय झाली.

संपूर्ण व्यवहार अ‍ॅमेझॉनबरोबर करणे शक्य होते का?

भारतातील थेट विदेशी गुंतवणूक धोरण-नियमानुसार किरकोळ विक्री व्यवसायात कोणत्याही परदेशी कंपनीला भारतीय कंपनीत १०० टक्के गुंतवणूक करता येत नाही. अन्य उपकंपन्यांमार्फत व काही प्रमाणात असे व्यवहार केंद्र सरकारच्या परवानगीशिवायही करता येतात. परिणामी फ्यूचर समूहावर संपूर्ण नियंत्रण मिळविणे अ‍ॅमेझॉनला शक्य नाही. अ‍ॅमेझॉनची फ्यूचरच्या उपकंपन्यांमध्ये निम्म्यापेक्षा कमी हिस्सेदारी होती. ही गुंतवणूक अ‍ॅमेझॉनला अप्रत्यक्षरीत्या वाढविता आली असती. मात्र रिलायन्ससारखा देशी उद्योग समूह व तोही रोखीने व्यवहार करणारा पुढे आल्याने फ्यूचरला आपसूकच अर्थदिलासा मिळाला.

व्यवहार काय?

– किशोर बियाणी यांच्या ‘फ्यूचर रिटेल’ कंपनीतील किरकोळ वस्तू विक्री/दालन साखळी व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलने २४,७१३ कोटी रुपये खर्चून नोव्हेंबर २०२० मध्ये ताब्यात घेतला.

– याद्वारे फ्यूचर समूहातील बिग बझार, फू ड हॉल, फॅ शन बझार, ई-झोन आदी नाममुद्रा रिलायन्सकडे गेल्या.

– यामुळे ३०,००० कोटींचा व्यवसाय आणि ५०,००० हून अधिक मनुष्यबळ रिलायन्सच्या अखत्यारीत आले. या व्यवहारामुळे बियाणी यांच्यावरील कर्जाचा मोठा भार हलका होत आहे.