महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. राज यांनी आपल्या खास शैलीमध्ये लॉकडाउन वाढत गेलाय तसं तसं आता कोकीळ पण कोविड कोविड आवाज देत असल्याचा भास होतं असल्याचे मजेदार वक्तव्य करत मुलाखतीची सुरुवात केली.

मुलाखतीची सुरवातच राज यांना लॉकडाउनसंदर्भातील प्रश्न विचारत झाली. “आपण सगळेच जण आता लॉकडाउनमध्ये आहोत. लॉकडाउनमध्येच आपण सर्वजण हिरक मोहोत्सवी वर्धापन दिन साजरा करतोय. तर याबद्दल तुमच्या काय भावना आहेत. किती सुखावणारं, त्रासदायक आहे आता सगळं वातावरण खास करुन लॉकडाउनमधलं. असा सवाल राज यांना विचारण्यात आला.

आणखी वाचा- लॉकडाउनच्या गोंधळावर राज ठाकरे यांची टीका; “करोना फ्लाईटनं परत जाणार आहे का?”

लॉकडाउनमध्ये सुखावणार काहीच नाहीय, असं सांगत राज यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं. “यात कुठच्याही बाजूने सुख नाहीय. पण अशाप्रकारे शांतता अनुभवायला मिळणं हे मला वाटतं गेल्या कित्तेक वर्षांमध्ये आठवतचं नाही. जन्मापासून कधी शहरात इतकी शांतता अनुभवल्याचे मला आठवतच नाही. कधीतरी आपण बाहेरगावी जातो किंवा जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा जी शांतता असते ती पाहून आपण म्हणतो की वा काय शांतता आहे. तीच शांतता आज आपल्याला या ठिकाणी सर्व शहरांमध्ये अनुभवायला मिळतेय. पक्षांचे आवाज ऐकायला येतायत,” असं निरिक्षण राज यांनी नोंदवलं.

आणखी वाचा- महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली: राज ठाकरे

“ज्या दिवशी लॉकडाउन सुरु झाला त्या दिवशी सकाळी मी माझी कुत्री आहे ‘कन्या’ तिच्याबरोबर खाली खेळत होतो. एरव्ही कोकीळेचा जो आवाज आपल्या सर्वांनाच ऐकू येतो. पण इतक्या शांततेमध्ये इतक्या पक्षांचे आवाज कधी ऐकले नव्हते. त्या कोकीळेचा आवाज आधीही ऐकू यायचा. पण तो जो कुहू कुहू आवाज आहे तो इतक्या शांततेत कधी ऐकला नव्हता. पण जसा जसा तो लॉकडाउन वाढत गेला ना तसा तसा तो कुहू कुहू कोकीळेचा आवाज आहे ना तो मला कोविड कोविड ऐकू यायला लागला,” असे मजेदार वक्तव्य राज यांनी नोंदवलं. तिसऱ्या लॉकडाउनसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी पत्रक जारी करण्याच्या काही तास आधीच राज यांनी ही मुलाखत दिली होती.