राज्य सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देत आहे तेवढं लक्ष पुण्याकडे देताना दिसत नसल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री सर्वात जास्त टेस्टिंग केल्याचा दावा करत आहे. पण महाराष्ट्र १९ व्या क्रमांकावर आहेत असंही ते म्हणाले आहेत. हे तीन चाकी सरकार असून रिक्षाची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेला आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वारंटाइन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही. वेळेत व्यवस्था निर्माण केली तर लोकांनी खूप अडचणींचा सामना करावा लागेल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आपल्या अपयशावरुन लक्ष हटवण्यासाठी वारंवार सरकार पाडण्याचा प्रयत्न असल्याचं तुणतुणं वाजवलं जात आहे. आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास सक्षम आहात. अंतर्विरोधानेच सरकार पडणार आहे.  त्यानंतर महाराष्ट्राचे भवितव्य काय ठरवून दाखवू. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. हे बेईमानीने आलेलं सरकार आहे.  जनेतेने आम्हाला आणि सोबत असणाऱ्या पक्षां निवडून दिलं होतं,” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भाजपाचा डीएनए संघर्षाचा असून जनतेसाठी संघर्ष करत राहू असंही ते म्हणाले आहेत

“करोनाच्या संकटात आम्ही तुम्हाला समर्थन दिलं आहे आणि पुढेही देऊ. पण चुकत असेल, लपवालपवी होत असेल तर अशा परिस्थितीत ते समोर आणणंही आमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री सर्वात जास्त टेस्टिंग केल्याचा दावा करत आहेत. पण महाराष्ट्र १९ व्या क्रमांकावर आहोत. मुंबईत पाच ते साडे पाच हजारांच्या वर टेस्टिंग होत नाहीत. मुंबईत टेस्टिंगवर निर्बंध आहेत. आपल्या पैशाने टेस्टिंग करा अशी परिस्थिती आहे,” असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

“अनेक भयानक घटना समोर येत असून क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला असुरक्षित आहेत. राज्य सरकारने एसओपी तयार करावं. महिला किमान सेंटरमध्ये सुरक्षित राहतील अशी व्यवस्था करा. करोनाच्या संदर्भात महत्त्वाची पाऊलं उचलली पाहिजेत अशी अपेक्षा आहे. टेस्टिंग वाढवणं गरजेचं असून हाच मोठा उपाय आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.