मुंबई महानगरपालिकेच्या वतीने होत असलेल्या करोना चाचण्या कमी असून प्रशासन आकडेवारी योग्यरित्या देत नसल्याचे आरोप महापालिकेने फेटाळून लावले आहेत. महापालिकेने आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढली असून आतापर्यंत ३ लाख ६४ हजार चाचण्या झाल्या असल्याची महिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

कोविड १९ संसर्गाच्या सुरुवातीपासूनच नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने करोना चाचण्या करण्यावर भर दिला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या निर्देशांचे योग्य पालन करुन प्रशासनाने चाचण्या केल्या आहेत. ३ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत पहिली करोना चाचणी करण्यात आली तर ११ मार्च २०२० रोजी पहिला करोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. ३ फेब्रुवारी ते ६ मे २०२० या कालावधीमध्ये मुंबईत १ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर १ जून २०२० रोजी २ लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला. तर दिनांक २४ जून २०२० रोजी ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. आज (दिनांक ८ जुलै २०२०) पर्यंत एकूण ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या झाल्या आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने अर्ध्या तासात निदान करु शकणारे ॲण्टीजेन टेस्ट युद्ध पातळीवर खरेदी करुन चाचण्यांना अधिक वेग दिला आहे. सुमारे १ लाख ॲन्टीजेन टेस्ट यामुळे होणार आहेत. ३ जुलै २०२० पासून ॲण्टीजेन टेस्टचा उपयोग करण्यात येत असल्याने आता दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ५५०० पर्यंत पोहोचली आहे. ८ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार दिवसभरात सुमारे ५ हजार ४८३ चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच, काही दिवसांपूर्वी असलेली दैनंदिन सरासरी ४ हजार चाचण्यांची संख्या आता वाढली आहे. याचाच अर्थ प्रशासन चाचण्यांची संख्या कमी करत नाही किंवा लपवतही नाही. उलटपक्षी पारदर्शकपणे वस्तुस्थिती वेळोवेळी सरकार आणि जनता यांच्यासमोर सादर करत असते असं महापालिकेने सांगितलं आहे.

चाचण्यांची संख्या वाढवताना त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्येही सुयोग्य बदल केले आहेत. प्रारंभी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वैद्यकीय प्रपत्र (प्रीस्क्रीप्शन) असल्याशिवाय चाचणी करण्यास परवानगी दिली जात नव्हती. त्यामध्ये सवलती देण्यात आल्या. ई-प्रीस्क्रीप्शन व रुग्णांनी स्वघोषणा पत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देण्यासारखे पर्याय उपलब्ध करुन सुलभता आणली. आता तर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या लिखित सल्ल्याशिवाय म्हणजेच ‘प्रिस्क्रीप्शन’ शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

एका बाजूला चाचण्या वाढवत असताना बाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये क्षमता वाढ, ठिकठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारणे, ऑक्सिजन व आयसीयू उपचार सुविधा पुरवणे ही कामेदेखील प्रशासनाने केली आहेत. सोबतच, बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचे अलगीकरण करण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. बाधितांच्या कमी-अधिक संपर्कात असलेल्या अशा सुमारे १६ लाखांहून अधिक व्यक्तिंचा आतापर्यंत शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्यात आला आहे. यातील सुमारे १३ लाख ४४ हजारापेक्षा अधिक व्यक्तिंनी अलगीकरण (क्वारंन्टाईन) पूर्ण केले आहे. विशेषत: बाधितांच्या अत्यंत जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती (हाय रिस्क कॉन्टॅक्‍ट) जास्तीत जास्त संख्येने अलगीकरण (क्वारंन्टाईन) करण्यात येत आहे. यामुळेदेखील रुग्ण संख्या नियंत्रणात आली आहे. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन आतापर्यंत ५ लाख ३८ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे. विविध परिसरांमध्ये ४४३ फिवर क्लिनीकच्या माध्यमातून तपासणी शिबीर घेऊन बाधितांचा शोध घेतला आहे. फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून हॉटस्पॉट भागांमध्ये शीघ्र कृती उपक्रम अशा प्रयत्नांतून करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली आहे. विशेषत: धारावीसारखा परिसर एकवेळ हॉटस्पॉट म्हणून गणला जात होता, तिथे आता काल (दिनांक ७ जुलै २०२०) फक्त एक तर आज (दिनांक ८ जुलै) तीनच रुग्ण बाधित आढळले, हे प्रशासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांचे उदाहरण आहे. धारावीतील अथक प्रयत्नांचे तर थेट केंद्र सरकारनेही कौतुक केले आहे असं महापालिकेने सांगितलं आहे.

देशभरात करोना विषाणू संक्रमणाच्या अभ्यासासाठी, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. हेच सर्वेक्षण मुंबईतही नीती आयोग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) आणि इतर संस्था यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे. ही चाचणी म्‍हणजे रक्‍त नमुने संकलित करुन केली जाणारी प्रतिद्रव्‍य चाचणी अर्थात ॲण्टीबॉडीज् टेस्‍ट आहे. एम/पश्चिम, एफ/उत्तर आणि आर/उत्तर या तीन विभागांची या सर्वेक्षणासाठी निवड करण्‍यात आली असून झोपडपट्टी भागात आण‍ि झोपडपट्टी नसलेल्‍या भागातही हे सर्वेक्षण करण्‍यात येत आहे. यामध्‍ये एकूण १० हजार नमुने यादृच्छिक पद्धत (Random) ने संकलित करण्यात येत आहेत. सेरो सर्वेक्षणाच्‍या फेऱया या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणात्मक निर्णयांसाठी महत्‍त्‍वाच्‍या ठरणार आहेत. तसेच संक्रमणाची लागण होण्‍याचा धोका असलेल्‍या इतर आजारांबाबत किंवा विशिष्‍ट वय/लिंग अशा गटांना असलेल्‍या त्‍याच्‍या धोक्‍याबाबत माहिती देण्‍यासाठी देखील हे सर्वेक्षण महत्‍त्‍वाचे आहे. महानगरपालिका प्रशासन करोना संसर्गाला रोखण्यासाठी गंभीर आणि संवेदनशील असल्यानेच तसेच नागरिकांच्या आरोग्य हितासाठीच हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.