News Flash

“आमच्यावर हसवण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?”

"मुंबई मॉडेल"च्या कौतुकानंतर आयुक्त इक्बालसिंग चहल यांची प्रतिक्रिया

मुंबईमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून वाढणारी रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी झाली आहे. शहरामध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मुंबईला हे यश मिळालं आहे. मुंबई महापालिकेच्या या कामाचं कौतुक बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील केले होतं. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्लीतील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात बोलताना मुंबई महापालिकेने करोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं. तसेच “मुंबई मॉडेल”सारख्या इतर काही ठिकाणी सुविधा करता येऊ शकतात का हे तपासण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.  यावर “आमच्यावर हसवण्याचंच ठरवलं असेल तर आम्ही देशाला मुंबई मॉडेल कसं समजवून सांगणार?” अशी प्रतिक्रिया आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली आहे.

करोनाच्या वाढत्या समस्येवर प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर “मुंबई मॉडेल” इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये राबवता येऊ शकते असे मत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मांडले आहे.

“दोन महिन्यांपूर्वी मला भारतीय प्रशासनात काम करणारे मित्र फोन करुन फक्त महाराष्ट्रातच कोव्हिड आहे का असे प्रश्न विचारत हसत होते. जर एखादी व्यक्ती आपल्यावर हसत असेल तर मी माझी काम करण्याच्या मॉडेलबाबत त्यांना कसे सांगेन? जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिकण्याची वेळ नसते, तेव्हा त्या मॉडेल्सप्रमाणे काम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही,” असे दि इंडियन एक्स्प्रेसच्या न्यूजरूम आयडिया एक्सचेंजच्या कार्यक्रमात आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले.

“कोणत्याही रुग्णालयामध्ये बेड्स वाढवण्याची सक्ती करू नये असे दिल्ली सरकारला मी सांगितले आहे. ऑक्सिजनयुक्त बेड वाढवल्याने रुग्णालयांकडून एसओएस कॉल वाढत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही आहे,” असे चहल यांनी सांगितले. उपलब्ध ऑक्सिजनचा योग्य उपयोग, योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे यामुळे मुंबईची ऑक्सिजन समस्या आता “इतिहास”जमा झाली असल्याचे चहल म्हणाले.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुंबईत कोणताही मृत्यू झाला नसल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले. मात्र एका मध्यरात्री आलेल्या संकटाबद्दल त्यांनी सांगितले. “१६ आणि १७ एप्रिलच्या मध्यरात्री ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे सहा रुग्णालयातील १६८ रुग्णांना मुंबईच्या ‘जम्बो’ कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्यातील ४० रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. अखेर सकाळी १ ते ५ च्या दरम्यान सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर मला १०० टक्के रुग्णांचा जीव वाचवता आला याचा आनंद झाला,” असे चहल म्हणाले.

या घटनेनंतर राज्याच्या टास्क फोर्ससोबत संपर्क साधत आम्ही ऑक्सिजनच्या वापरासाठी प्रोटोकॉल ठरवण्याची विनंती केली. ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत आपण दिल्लीतही याबाबत बोललो असल्याचे चहल म्हणाले. मी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव आणि आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ मुख्य राजकारण्यांनाही याबाबत सांगितले असल्याचे चहल म्हणाले.

गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईमध्ये करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना चहल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर वॉर्ड वॉर रूम तयार करणे, बेडसाठी डॅशबोर्ड तयार करणे, कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना तो रिपोर्ट त्याच्याकडे न देता महापालिकेला कळवणे यासारखे उपाय केले होते. पहिल्या लाटेनंतर जंबो कोविड सुविधा असलेले हॉस्पिटल बंद न करण्याचा निर्णय घेतल्याने दुसरी लाट हातळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे चहल यांनी सांगितले.

मुंबईत आधीच करोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी करत असल्याचे चहल यांनी सांगितले. अधिक जांबो सुविधा असलेले जवळजवळ ५,५०० बेड्स उपलब्ध करत आहोत त्यातील ७० टक्के हे ऑक्सिजन बेड्स असतील अशी माहिती महापालिकेचे आयुक्त चहल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 11:21 am

Web Title: coronavirus bmc chief if he decides to make fun of us how can we explain the mumbai model to the country abn 97
Next Stories
1 सुनियोजनामुळे प्राणवायूच्या समस्येवर मात
2 अत्यावश्यक सेवा कर्मचारीच बेफिकीर
3 नव्या शैक्षणिक वर्षांतही शुल्ककपातीचा आग्रह
Just Now!
X