04 December 2020

News Flash

पालिकेची करोना कसोटी!

दिवाळीच्या धामधुमीत वाढलेली वर्दळ, बाजारातील गजबज, भेटीगाठी अशा विविध कारणांमुळे करोनाचा संसर्ग अचानक फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या उत्साही वातावरणानंतर बाजारात सध्या गजबज कमी झाली असली तरी, हिवाळय़ाच्या तोंडावर उबदार कपडय़ांच्या खरेदीची लगबज सुरू झाली आहे.

करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आवाहन; बहुसंपर्क असलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांवर भर

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत वाढलेली वर्दळ, बाजारातील गजबज, भेटीगाठी अशा विविध कारणांमुळे करोनाचा संसर्ग अचानक फोफावण्याची भीती व्यक्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेने करोना निदान चाचण्यांची घटलेली संख्या पुन्हा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. रुग्णांचा मोठय़ा प्रमाणावर शोध घेण्यासाठी पालिकेने दुकानदार, फेरीवाले, बेस्ट-एसटी चालक-वाहक, पोलीस, सुरक्षारक्षक, आरोग्य कर्मचारी अशा बहुसंपर्क असलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील करोना रुग्णवाढीचा दर ०.२३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दररोज हजाराच्या आत रुग्णांची नोंद होते आहे, तर दिवाळीच्या पाच दिवसात दर दिवशीच्या रुग्णांची संख्या सरासरी पाचशेच्या आसपास होती.  रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढून २५० दिवसांच्या आसपास गेला आहे. मात्र दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान मोठय़ा प्रमाणावर लोक खरेदीसाठी व नातेवाईकांकडे जाण्यासाठी बाहेर पडले होते. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क खूप वाढला होता. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणे दिवाळीनंतरच्या दिवसांत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दर दिवशी १८ ते २० हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य ऑक्टोबरमध्ये दिले होते. त्यानंतर दर दिवशी हे लक्ष्य गाठणे पालिकेच्या यंत्रणेला शक्य झालेले नसले तरी चाचण्यांची संख्या १४ ते १५ हजारापर्यंत पोहोचली होती. मात्र सणाच्या पाच दिवसांत चाचण्यांची संख्या घटली होती. १५ नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे केवळ ३९०० चाचण्या करण्यात आल्या होत्या. सणामुळे लोकही चाचण्या करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे साहजिकच रुग्णांची संख्याही कमी येत होती. मात्र आता दिवाळी संपल्यानंतर पालिकेने पुन्हा एकदा चाचण्या वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, दिवाळी संपल्यामुळे आता आम्ही चाचण्यांची संख्या पुन्हा एकदा १४ ते १५ हजारांपर्यंत वाढवू. मंगळवारपासूनच चाचण्या वाढवण्यास सुरुवात झाली आहे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ज्यांचा आला आहे, अशांच्या चाचण्या करण्यास आधी सुरुवात केली आहे. त्यात दुकानदार, फेरीवाले, बेस्ट बस व एसटीचे चालक व वाहक, पोलीस, सुरक्षारक्षक, खासगी व पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, केटरिंग कर्मचारी यांच्या चाचण्या प्रामुख्याने करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पॉझिटिव्हिटी प्रमाणावर लक्ष

चाचण्यांमधून बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटीचा दर) नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत खूप खाली आले होते. पहिल्या दहा दिवसांत हे प्रमाण सरासरी ७ टक्क्यांच्याही खाली होते. तेच ऑक्टोबरमध्ये १४ टक्क्यांपर्यंत होते. तर सप्टेंबरमध्ये १५ टक्क्यांपर्यंत होते. आता दिवाळीनंतर चाचण्या वाढवल्यावर हे प्रमाण किती असेल याकडे पालिकेचे लक्ष असणार आहे. मुंबईत सध्या १७ लाखांपर्यंत चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालिकेने चाचण्या वाढवण्यासाठी १ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत केंद्रे सुरू केली. मात्र सणाच्या काळात चाचण्या करण्यास लोक तयार नसल्यामुळे चाचण्यांची संख्याही घटली आहे.

पुढील चार-पाच दिवस आम्ही निरीक्षण करणार आहोत. चाचण्यांची संख्या वाढल्यानंतरही बाधितांची संख्या किती आहे म्हणजेच ‘पॉझिटिव्हिटी रेट’ किती असेल याकडे आमचे बारीक लक्ष असेल. त्यातूनच रुग्ण वाढत आहेत की आटोक्यात आहेत हे ठरवता येईल.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:21 am

Web Title: coronavirus bmc corona challenges d70
टॅग Coronavirus
Next Stories
1 रुग्णसंख्या घटल्याने ६७ टक्के खाटा रिकाम्या
2 चैत्यभूमी दुरुस्तीसाठी २९ कोटींचा निधी
3 दहा वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी
Just Now!
X