मुंबई महापालिकेतील विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. शिरीष दीक्षित यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरीष दीक्षित यांचा माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचं निधन झालं. महत्त्वाचं म्हणजे ५५ वर्षीय शिरीष दीक्षित हे सोमवारपर्यंत कामावर हजर होते अशी माहिती मिळत आहे. त्यांचा मृतदेह सायन रूग्णालयात नेण्यात आला असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.

महापालिकेने निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा खात्‍याचे प्रमुख अभियंता असणारे शिरीष दीक्षित सोमवारी रात्री निधन झालं. त्यांच्याकडे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) या पदाची देखील अतिरिक्‍त जबाबदारी होती. १९८७ मध्‍ये ‘दुय्यम अभियंता’ (सब इंजिनिअर) या पदावर रुजू होत, त्‍यांनी आपल्‍या महापालिका सेवेची सुरुवात केली होती. आपल्‍या महापालिकेतील सेवा कारकिर्दीदरम्‍यान पाणीपुरवठा विषयक अनेक महत्‍त्‍वाचे प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यात त्‍यांची महत्‍त्‍वाची भूमिका होती. शिरीष दीक्षित यांच्‍या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.

‘कोरोना कोविड-१९’ च्‍या अनुषंगाने अधिक प्रभावी उपचारांसाठी महापालिकेद्वारे वरळी येथील एनएससीआय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘रेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या करोना अलगीकरण केंद्रांच्‍या उभारणीत शिरीष दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता. त्‍याचबरोबर तिथे वेळोवेळी अभियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्‍यातही त्यांचा पुढाकार होता.

लॉकडाऊनच्‍या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्‍याची जबाबदारी त्‍यांच्‍यावर सोपविण्‍यात आली होती. ही जबाबदारी त्‍यांनी मनुष्‍यबळ संख्‍येचे आव्‍हान असतानाही समर्थपणे पार पाडली. पाणीपुरवठा प्रकल्‍पांपैकी, मध्‍य वैतरणा प्रकल्‍पांतर्गत असणा-या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रि‍या केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्‍प यासारखे अनेक प्रकल्‍प यशस्‍वीपणे राबविण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्‍बल १५ किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्‍यात आणि गारगाई प्रकल्‍पाला गती देण्‍यात त्‍यांचे मोठे योगदान होते.