मुंबईत पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात असून निर्बंधही आणले जात आहेत. गेले दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक मैदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारं ओव्हल मैदाना शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही. गुरुवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून हे मैदान बंद करण्यात येणार आहे.

रुग्णसंख्येत मोठी वाढ

“करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पूर्वकाळजी म्हणून आम्ही मैदान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती महापालिकेच्या ए वॉर्डमधील सहाय्यक नगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे.

चर्चगेटमध्ये असणाऱ्या ओव्हल मैदानात क्रिकेट. फूटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अगदी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, विरारपासून तरुण या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. याशिवाय जॉगिंग तसंच मॉर्निग वॉकसाठीही गर्दी होत असते. चंदा जाधव यांनी गेल्या आठवड्यात मैदानावर जाऊन पाहणी केली असता करोना रुग्ण वाढत असतानाही तेथील गर्दी कमी होत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. दरम्यान मुंबई पालिकेने ज्या ठिकाणी गर्दी होत आहे अशा सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध आणण्यासंबंधी वॉर्ड स्तरावर निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

नियम तोडणाऱ्यांविरुद्ध मुंबईत कडक कारवाई
मुंबईत बुधवारी तब्बल एक हजार १६७ जणांना करोनाची बाधा झाली तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा दरही ०.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होत होती. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेले दोन दिवस रुग्णसंख्या उतरणीला लागली होती. मात्र, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. आतापर्यंत मुंबईत तीन लाख २१ हजार ६९८ जणांना करोना झाला आहे. तर तीन लाख एक हजार ५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर स्थिर आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २९४ दिवसांवर घसरला आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेल्या २४ तासांमध्ये सुमारे २१ हजार १२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या गटातील सहा हजार ७३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus bmc to shut iconic oval maidan from friday sgy
First published on: 25-02-2021 at 12:31 IST