27 November 2020

News Flash

दिवाळीमुळे सावरलेल्या बाजाराचे लग्नसराईकडे डोळे

करोनामुळे व्यवसाय उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता लग्नसराईचे दिवस आल्याने बाजार पुन्हा बहरेल अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कमी व्यवसाय; मात्र, व्यापार सुरळीत होत असल्याचे समाधान

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोनामुळे व्यवसाय उद्ध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत विक्री काहीशी वाढल्याने व्यवसायात धुगधुगी आल्याचे समाधान व्यापाऱ्यांना मिळाले. आता लग्नसराईचे दिवस आल्याने बाजार पुन्हा बहरेल अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने दुकानदारांचा व्यवसाय बुडाला. ऑगस्टमध्ये दुकाने सुरू करूनही वाहतुकीवर बंधने असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली. दुकानदारांना दिवसभरात एक-दोन ग्राहक मिळणेही दुरापास्त झाल्याने त्यांचे कंबरडे अक्षरश: मोडले. मात्र दिवाळीनिमित्त ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. महिलांना रेल्वेतून प्रवासाची मुभा मिळाल्याने त्यांनीही खरेदीसाठी बाजारपेठ गाठली.

अर्थात दिवाळीत ग्राहकांचा प्रतिसाद वाढला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. लोकल रेल्वे सेवा सर्वासाठी खुली नसल्याने आणि ग्राहकांची क्रयशक्ती घटल्यानेही विक्रीला बसल्याचे दादर येथील महाशक्ती कलेक्शन दुकानाचे मालक प्रकाश वोरा यांनी सांगितले. ‘दरवर्षी १५ दिवस दिवाळीची विक्री होत असे. यंदा फक्त आठवडाभर ग्राहकांनी खरेदी केली. त्यातून मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्के व्यवसाय झाला. पुढील वर्षी व्यवसाय पूर्ववत होईल,’ अशी आशा प्रकाश यांनी व्यक्त केली.

‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० ते ५० टक्के विक्री झाली. दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त बहीण, पत्नी अथवा आईला भेट देण्यासाठी साडी खरेदीकरिता येणारा ग्राहक यंदा नव्हता. पुढील महिन्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने काहींनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र बहुतांश जणांचे बजेट कोलमडल्याने किंवा लग्नाचा मोठा तामजाम आणि लोकांच्या सहभागावरील मर्यादांमुळे खरेदीचा खर्चही २० ते ३० टक्क्यांनी कमी केली आहे,’ अशी माहिती आसोपालव या हिंदमाता परिसरातील साडय़ांच्या दुकानाचे मालक रमेश गोगरी यांनी दिली.

मागील महिन्याच्या तुलनेत व्यवसाय वाढल्याचे सोनचाफा या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातील कर्मचारी शाम वांद्रे यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के विक्री झाली आहे, अशी माहिती शाम यांनी दिली. तर लोकल रेल्वे सेवा सुरू झाल्याने महिलांकडून खरेदी वाढल्याचे रॉयल बॅगचे जय चौरसिया यांनी सांगितले. ‘मागील आठ महिन्यात व्यवसाय

पूर्णत: बुडाला होता. महिला घराबाहेर नसल्याने बॅग विक्री थांबली होती. मात्र नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून व्यवसाय काहीसा वाढला आहे. सध्या ५० टक्के व्यवसाय पूर्ववत झाला असून यातून टाळेबंदीत झालेले ७ लाख रुपयांचे नुकसान काहीसे भरून निघेल,’ अशी आशा चौरसिया व्यक्त करतात. शोभेच्या दागिन्यांना (इमिटेशन ज्वेलरी) ही मागणी वाढल्याचे झवेरी बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

‘गेल्या वर्षी एवढा व्यवसाय होण्याची अपेक्षा नाही. मात्र मागील काही महिन्यांच्या तुलनेत विक्री चांगली झाली. जवळपास ४० ते ५० टक्के व्यवसाय पूर्ववत झाला. रेल्वे सुरू झाली तर आणखी मदत मिळेल,’ असे मत झवेरी बाजार इमिटेशन असोसिएशनचे प्रमुख हितेश कोठारी यांनी सांगितले.

‘मागील काही महिन्यांच्या तुलनेत दिवाळीत खरेदी ५० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत विक्री अद्यापही ३० टक्क्यांवर रोडावली आहे. सध्याच्या विक्रीतून व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असून भविष्यात व्यवसाय पूर्ववत होईल, अशी आशा यातून निर्माण झाली आहे. सरकारने ग्राहकांकडे थेट पैसे आणि करात विविध सवलती दिल्यास त्यांच्याकडून आणखी खरेदी वाढून व्यवसायाची गाडी रुळावर येण्यास मदत मिळले.’
विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:19 am

Web Title: coronavirus business on track in diwali looking forward to wedding season dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 ट्रक अपघातात पायाची बोटे गमावणाऱ्याला ५.१२ लाखांची भरपाई
2 गिरगाव येथील प्रसिद्ध हॉटेलला उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
3 मुंबईत दिवसभरात ८७१ करोनाबाधित
Just Now!
X