गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचे मुख्यमंत्र्यांचे ‘माझा डॉक्टर’ परिषदेत आवाहन

मुंबई : राज्यात उपचाराधीन करोना रुग्णांपैकी ७२ टक्के बाधित मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नगर या पाच जिल्ह्यंत आहेत. मुंबईत रविवारी करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीने दोन महिन्यांतील उच्चांक नोंदवला, तर ठाणे जिल्ह्यतही काही दिवसांपासून रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डॉक्टर’ परिषदेत केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन परिषदेला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, करोना कृतिदलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, बालकांच्या कृतिदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांच्यासह अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत असणारे आणि नायर रुग्णालयाचे स्नातक डॉ. मेहुल मेहता यांनी मार्गदर्शन के ले.

राज्यातील करोनाची सद्य:स्थिती, दैनंदिन रुग्णसंख्या, चाचण्या यांचा आढावा आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या परिषदेत मांडला.

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात कमी होऊन सुमारे ५० हजारांपर्यंत होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात पुन्हा किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात ५० हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक १५ हजार ४६९ (२९.७३ टक्के) रुग्ण पुण्यात आहेत, तर त्या खालोखाल ठाण्यामध्ये ७,१७१(१३ टक्के), साताऱ्यामध्ये ६१७५(११.८७ टक्के), अहमदनगरमध्ये ५०५१ (९.७१ टक्के) तर मुंबईत ४०३१(७.७५ टक्के) रुग्ण आहेत. यापाठोपाठ सांगली (६.८० टक्के), सोलापूर (५.१७ टक्के), रत्नागिरी (२.१० टक्के), कोल्हापूर (१.९६ टक्के) आणि सिंधुदुर्ग (१.७४ टक्के) रुग्ण आहेत. असे १० जिल्ह्यांमध्येच ९० टक्के रुग्ण आहेत.

रुग्णसंख्या अधिक असलेल्या पाच जिल्ह्यांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील रुग्णांचे निदान वेळेत होऊन विलगीकरणासाठी ‘माझा डॉक्टर’ची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केले. राज्यातील सहा हजारांहून अधिक डॉक्टर्स, परिचारिका, नागरिक या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषेदेचे सूत्रसंचालन राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केले.

२६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये राज्यात ४४ हजार ४३७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यात सर्वाधिक २२ टक्के रुग्ण पुण्यात आढळले आहेत, तर अहमदनगरमध्ये १७ टक्के, साताऱ्यात ११ टक्के, सोलापूर आणि मुंबईत नऊ टक्के रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे.

मुंबई पुन्हा पहिल्या पाचांत

ऑगस्टमध्ये सर्वाधिक उपचाराधीन रुग्णांची संख्या असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होता. मुंबईचे स्थान यात सातवे होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.  सप्टेंबरमध्ये पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुंबईचा समावेश झाला आहे. शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर २० दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येने जवळपास पाचशेचा आलेख पुन्हा गाठला आहे. मुंबईत रविवारी ४९६ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. १२ जुलैनंतर प्रथमच शहरात दैनंदिन रुग्णसंख्या पावणे पाचशेपर्यत गेली आहे. मुंबईत १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल केले. त्यानंतर आठच दिवसांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढायला सुरूवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी मुंबईत ४९६ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे, तर २३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या तुलनेत मृतांची संख्या मात्र अजूनही कमीच आहे. रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील एका रुग्णाला दीर्घकालीन आजार होते. एक रुग्ण ६० वर्षांवरील तर दुसरा रुग्ण ४० वर्षांखालील होता.

बाधितांचे प्रमाण पुन्हा पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक

ऑगस्टमध्ये केवळ पुण्यामध्ये बाधितांचे प्रमाण ५.५२ टक्के होते आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पाच टक्क्य़ांखाली होते, परंतु सप्टेंबरमध्ये पुण्यातील प्रमाण ६.५८ टक्क्य़ांवर गेले आहे, तर अहमदनगरमध्ये पाच टक्क्य़ांवर गेले आहे. त्यामुळे आता बाधितांचे प्रमाणही या जिल्ह्यांमध्ये पुन्हा काही अंशी वाढताना दिसत असून, वेळीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत डॉ. व्यास यांनी व्यक्त केले.

दैनंदिन चाचण्यांमध्येही घट

राज्यात चाचण्यांची क्षमता सुमारे तीन लाख असून संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक असताना दोन ते अडीच लाख दैनंदिन चाचण्या करण्यात येत होत्या, परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दैनंदिन चाचण्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येते. त्यात सप्टेंबरमध्ये हे प्रमाण दोन लाखांपेक्षाही कमी झाले. संसर्गाचे प्रमाण आणि रुग्णसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञांनी या परिषदेत व्यक्त के ले.

१७ जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा कमी रुग्ण

राज्यात १७ जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षाही कमी उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या आहे. यात नंदुरबार, वर्धा, वाशिम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, नांदेड, जालना, गडचिरोली, परभणी, नागपूर, हिंगोली, जळगाव, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे.

४५ टक्के नागरिकांना लशीची एक मात्रा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण वेगाने होत असून, १८ वर्षांवरील ४५ टक्के नागरिकांनी किमान एक मात्रा घेतलेली आहे, तर ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये हे प्रमाण ५४ टक्के आहे. १८ ते ४४ वयोगटातील ३५ टक्के नागरिकांनी लशीची एक मात्रा घेतलेली आहे. राज्यात ऑगस्टमध्ये सर्वाधिक १ कोटी ४४ लाख ८३ हजार ८७० लसीकरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये दोन कोटींपर्यंत लसीकरण होण्याची शक्यता आहे, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

‘जनतेच्या जीवाशी खेळू नका’

सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. मात्र, काही जणांना सर्व काही उघडण्याची घाई झाली आहे. त्यांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  भाजपला लगावला. उपचारांच्या सुविधा उपलब्ध केल्या तरी प्राणवायू निर्मितीला मर्यादा आहेत. राज्यात निर्माण होणाऱ्या प्राणवायूपैकी सध्याही २०० मेट्रिक टन करोना रुग्णांसाठी तर १५० मेट्रिक टन इतर आजारांच्या रुग्णांसाठी वापरला जातो. राज्यात सुमारे १४०० टनची निर्मिती होत असली तरी यातील प्राणवायू उद्योगांनाही दिला जातो. त्यामुळे तिसरी लाट अपरिहार्य असली तरी तिला थोपविण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.