उच्चभ्रू वस्त्यांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण जास्त

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर स्वसुरक्षेची पुरेशी काळजी न घेताच बेशिस्त नागरिकांनी सुरू केलेल्या स्वैरसंचाराचा फटका अंधेरी पश्चिम भागाला बसू लागला आहे. येथील झोपडपट्टय़ांमधील रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असतानाच आता उच्चभ्रू वस्त्यांमध्ये वाढू लागलेली करोनाबाधितांची संख्या पालिकेसाठी डोकेदुखी बनू लागली आहे. त्यामुळे उच्चभ्रू वस्त्यांमधील प्रतिबंधित क्षेत्र आणि टाळेबंद इमारतींमध्ये प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागातील अंधेरी (पश्चिम) आणि आसपासच्या परिसरात मे आणि जूनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे पालिकेने करोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली होती. पालिकेने या परिसरातील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल एक लाख ७५ हजार ११० जणांचा शोध घेतला असून यापैकी ८२ हजार ९ जण झोपडपट्टीतील, तर ९३ हजार १११ जण उच्चभ्रू आणि चाळींमधील आहेत. झोपडपट्टीतील १२ हजार ३८५ आणि इमारतींमधील १४ हजार २५१ जणांचा समावेश अतिजोखमीच्या, तर अनुक्रमे ६९ हजार ६२४ व ७८ हजार ८६० जणांचा समावेश कमी जोखमीच्या गटात आहे. चाचणी केल्यानंतर यापैकी दोन हजार ६९१ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर करोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील दोन हजार १४८ जणांनाही करोना झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले.

आजघडीला या परिसरातील रुग्णसंख्या एकूण चार हजार ८३८ च्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत तीन हजार २७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर इमारतींमधील करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत या परिसरातील ३१४ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

राज्य सरकारने अर्थचक्र हळूहळू रुळावर आणण्यासाठी टाळेबंदी काही अंशी शिथिल केली. सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात आली. केशकर्तनालये सुरू करण्यात आली. मार्चपासून घरात बसलेल्या उच्चभ्रू वस्त्यांमधील रहिवासी टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडू लागले. तर काही जण विनाकारणच घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी योग्य प्रकारे घेतली जात नाही, तसेच शिस्तीचे पालन होत नाही. परिणामी, आता उच्चभ्रू वस्त्यांमधील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

उच्चभ्रू वस्त्या आणि इमारतींमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी शिस्त पाळून पालिकेला सहकार्य करावे.

– विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’