बहुतांश बाधित अत्यावश्यक सेवेतील; उपचाराधीन रुग्णांची संख्याही अधिक

मुंबई : मुंबईतील २४ विभागांपैकी बोरिवलीत सर्वात वेगाने रुग्णवाढ होत असून येथील १२,८०० बाधितांपैकी ११ हजारांहून अधिक बाधित हे इमारतीत राहणारे आहेत. बाधितांबरोबरच उपचाराधीन असलेले रुग्णही बोरिवलीत सर्वाधिक आहेत. हे बहुतांश रुग्ण अत्यावश्यक सेवेतील आहेत.

सप्टेंबर महिन्यापासून मुंबईत करोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले. मात्र गेल्या आठ दिवसांत हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र हे दिलासादायक चित्र बोरिवलीत नाही. येथे दर दिवशी शंभर ते दीडशे रुग्णांची नव्याने नोंद होत आहे. येथील रुग्णवाढीचा कालावधी ४६ दिवसांवर आला आहे. ‘बोरिवलीतील एकूण १२,८०० बाधितांपैकी ११ हजारांहून अधिक  बाधित इमारतीतील आहेत तर केवळ १,०७५ बाधित झोपडपट्टय़ांमधील आहेत. त्यामुळे इमारतीत राहणाऱ्यांनी नियम पाळणे गरजेचे आहे,’ असे येथील आर. मध्य विभागाच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले. कायम गजबजलेला, खरेदीसाठी आणि खाऊगल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरिवलीतील रुग्णवाढ पालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. पालिकेच्या आर. मध्य विभागाने चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आह. त्यामुळे मोठय़ा संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. तसेच, बोरिवलीत आतापर्यंत बाधित झालेल्या लोकांमध्ये ६० टक्के प्रमाण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आहे. त्यात बँकेत काम करणारे, पालिकेचे कर्मचारी व अधिकारी, पोलीस, केंद्र सरकारचे कर्मचारी यांची संख्या मोठी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

करोना नियंत्रणात आणण्यात झटणाऱ्या पालिकेचे कर्मचारीही मोठय़ा संख्येने बाधित झाले आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने रस्त्यावर आलेल्या नागरिकांपुढे पालिके चे मनुष्यबळ तोकडे पडते. तरीही आम्ही वसाहतींमध्ये आरोग्य शिबिरे भरवणे, मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करणे या मोहिमा सुरूच ठेवल्या आहेत. फक्त बोरिवलीतच आतापर्यंत ३५ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर मुखपट्टय़ा न लावणाऱ्या १३०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

– भाग्यश्री कापसे, साहाय्यक आयुक्त, आर. मध्य

बोरिवलीतील स्थिती

एकूण बाधित      १२,८५७

करोनामुक्त        १०,१६१

मृत्यू                    ३५८

उपचाराधीन         २,३३८

रुग्णवाढीचा दर   १.५१ टक्के

रुग्ण दुपटीचा कालावधी   ४६ दिवस (दीड महिना)

बोरिवलीतील एका आठवडय़ातील रुग्णवाढ

२२ सप्टेंबर            १४४

२३ सप्टेंबर            २३०

२४ सप्टेंबर            २०२

२५ सप्टेंबर            १८५

२६ सप्टेंबर            १७७

२७ सप्टेंबर            २२५

२८ सप्टेंबर            ११४