लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : येत्या महिन्यात करोनावरील लस येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने आतापासून तयारी सुरू केली असून लस साठवण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य विभागाच्या इमारतीत शीतगृह तयार करण्याचे ठरवले आहे.

येत्या काळात लस उपलब्ध झाल्यास ती साठवून ठेवता यावी याकरिता पालिकेने मुंबईत जागा निश्चित केल्या आहेत. पालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये आणि रक्तपेढय़ांमध्ये शीतगृहे उपलब्ध आहेत. मात्र मोठय़ा संख्येने लशीचा पुरवठा झाल्यास ते साठवण्यासाठी ही इमारत निवडण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ही इमारत आरोग्य विभागाची इमारत असून त्याचा एक मजला सध्या शीतगृहासाठी तयार केला जाणार आहे. गरज भासली तर आणखी दोन मजले घेता येतील, असेही त्यांनी सांगितले. या मजल्यावर तापमान कमी राखणारी यंत्रणा उभारणे, व्यवस्थापन, तसेच लशीचा साठा उतरवणे, चढवणे याकरिता यंत्रणा येत्या महिनाभरात तयार केली जाणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

देशात सध्या तीन लशींवर संशोधन केले जात असून त्यापैकी सीरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्डच्या लशीवर संशोधन करीत आहे. या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होत आली आहे. त्यासाठी पालिकेच्या नायर व केईएम रुग्णालयात चाचण्या सुरू आहेत. नायरमध्ये १४८ स्वयंसेवकांना दुसरा तर केईएममध्ये १०० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या आठवडय़ात ज्यांना डोस दिला, त्यांचे २८ दिवस निरीक्षण केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

स्थानिकांना फायदा

  • सहा लाख लशी साठवण्याची क्षमता
  • पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक ते दीड लाख लशी साठवण्याची क्षमता आहे. तर कांजूरमार्ग येथे पाच लाख लशी साठवता येणार आहेत.

यांना प्राधान्य

लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार असे आजार असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मुंबईची लोकसंख्या १.४० कोटी गृहीत धरल्यास त्याच्या १० टक्के म्हणजेच १४ लाख लोक हे या वर्गातील असतील, असा अंदाज आहे. पालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये, पालिकेचे दवाखाने यांच्या माध्यमातून ही लस दिली जाऊ शकते.