प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट थोपवून धरण्यासाठी मुंबई महापालिकेने निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या असून बाजारपेठा, मंडया, रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र करोनाची चाचणी करण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्यांना संबंधित ठिकाणी व्यवसाय करण्यास अटकाव करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी, काही राज्यांमध्ये फोफावणारा करोनाचा संसर्ग आदी बाबी लक्षात घेऊन मुंबईत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून मंडया, छोटय़ा-मोठय़ा बाजारपेठा आणि रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे भाजी, फळे आदी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे करोनाचा संसर्ग पसरू शकतो. ही बाब लक्षात घेत मुंबईतील समस्त फेरीवाल्यांची करोना चाचणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्यासाठी बाजारपेठा, मंडया आदी ठिकाणी करोना चाचणीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबईतील अन्य भागांत करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना उत्तर मुंबईत मात्र परिस्थिती गंभीर बनल्याचे निदर्शनास आले होते. आता करोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे उत्तर मुंबईत ठोस पावले उचलण्यात येत आहेत. बोरिवली पूर्व आणि पश्चिम परिसरातील छोटय़ा-मोठय़ा बाजारपेठा, मंडयांमध्ये खरेदीच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने ग्राहक येत असतात. तसेच काही रस्त्यांवर पथाऱ्या पसरून फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. ग्राहकांच्या वर्दळीमुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. परिणामी, फेरीवाल्यांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फेरीवाले बाधित झाल्यास ग्राहकांनाही संसर्ग होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांपासून फेरीवाल्यांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांमध्ये बोरिवलीतील तब्बल ६६७ फेरीवाल्यांची आरटीपीसीआर, तर २७० फेरीवाल्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आली आहे. या ९३० फेरीवाल्यांमध्ये १८ जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

करोनाची चाचणी करून घेण्यासाठी काही फेरीवाले तयार होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा फेरीवाल्यांना संबंधित ठिकाणी व्यवसाय करू न देण्याची भूमिका आता पालिकेने घेतली आहे. व्यवसाय करता येणार नाही असे समजल्यानंतर फेरीवाले चाचणी करून घेत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये छोटय़ा-मोठय़ा कामानिमित्त अनेक व्यक्ती येत-जात असतात. तसेच नगरसेवकांचा विभाग कार्यालयात राबता असतो. कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींमुळे करोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिकेच्या बोरिवली येथील आर-मध्य विभाग कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. कार्यालयात उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा करोनापासून बचाव करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. आतापर्यंत कार्यालयात आलेल्या सुमारे १० हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या पथकांकडून गोवंडी येथील वस्त्यांमध्ये करोना चाचण्या करण्यात येत आहेत.

मुंबईत करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चाचणीस नकार देणाऱ्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येईल. नागरिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाग्यश्री कापसे, साहाय्यक महापालिका आयुक्त, आर-मध्य