राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असतानाच मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करोनाग्रस्त व्यक्ती रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील चेंबुर भागात असलेल्या साई हॉस्पिटलला तातडीनं सील करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतरही रुग्णालयांवर या घटनेचा परिणाम झाला आहे.

मुंबईतील चेंबूर परिसरातील साई हॉस्पिटलमध्ये आईसह तीन दिवसांच्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. “२९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेनं आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितलं,” अशी माहिती महिलेच्या पतीनं दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.

ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनानं तातडीनं पाऊल टाकत साई हॉस्पिटलला सील केलं आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे सैफी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, भाभा हॉस्पिटल आणि हिंदुजा हॉस्पिटलवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या गुरूवारी आणखी तीनने वाढली. पुण्यात दोन, बुलढाण्यात एकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.