प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : दादर, माहीम, धारावी आणि आसपासच्या परिसरात खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांचीही पालिके तर्फे  करोना चाचणी करण्यात येणार आहे.

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी झालेल्या गर्दीनंतर मुंबईत करोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लहान-मोठय़ा बाजारपेठा, फेरीवाले आदींकडे खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठा, तसेच रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या करोना चाचण्या करण्याचा सपाटा पालिकेने लावला.

बहुतांश नागरिक उपाहारगृहात जाऊन खाद्यपदार्थ खाण्याऐवजी ते स्विगी किंवा  झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांकरवी घरीच मागविणे पसंत करीत आहेत. घरोघरी फिरणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत या कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.

टाळेबंदीनंतर काही अटीसापेक्ष सौंदर्य प्रसाधनगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली . तिथे मोठय़ा संख्येने महिला जात असतात. ही बाब लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

३४ सफाई कामगारांना बाधा

पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने दादर, माहीम, धारावीत साफसफाईचे काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २,५२८ सफाई कामगारांची करोना चाचणी केली असून त्यांच्यापैकी ३४ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्याचबरोबर पोलीस ठाणे, सागरी पोलीस ठाणे, बाजारपेठा, औद्योगिक ठिकाणे येथे आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये १,१७२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १४ जण करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले, तर मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून ३८६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीदरम्यान तिघांना बाधा झाल्याचे आढळले. ४०८६ पैकी ५१ बाधित रुग्ण सापडले असून काही जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले, तर काही जणांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्विगी आणि झोमॅटोचे कर्मचारी घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे काम करतात. त्यासाठी त्यांना सतत ठिकठिकाणी फिरावे लागते. परिणामी करोनाच्या संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दादर, माहीम आणि आसपासच्या परिसरात खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’