राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुकवरुन राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जनतेला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांना उत्तरे दिली. एका व्यक्तीने पोलिसांचा त्रास होतोय, पोलीस सक्ती करतायत त्या संदर्भात प्रश्न विचारला, त्यावर शरद पवारांनी या विषयाला दोन बाजू असल्याचे सांगितले.

“सध्या शिस्तीची गरज आहे. पोलिसांना इच्छा नसताना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. त्याचा परिणाम दिसतोय. लोक शिस्तीने वागत आहेत. काही चार-पाच टक्के लोकांसाठी कठोर भूमिका घेतली. थोडे दिवस हे सहन करावं लागेल. परिस्थिती बदलतेय, लोक सहकार्य करतायत हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अत्यावश्यक सेवेच्या गाडयांना अडवू नये” अशी सूचना शरद पवार यांनी केली.

दरम्यान आरोग्य सेवा आणि पोलीस आज आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यांना विशेष प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

करोनाशी सगळ्यांनी एकत्र लढा देण्याची गरज
राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परीणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. करोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांनी केलं.