संदीप आचार्य

मुंबईतील सर्व शिल्लक मृत्यू सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत स्पष्ट होतील, असे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी जाहीर केले होते. मात्र बुधवार उजाडला तरी पालिकेतील शिल्लक करोना रुग्णांच्या मृत्यूंची माहिती अजून उघड झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील करोना मृत्यूदरावरून परिणामकारक उपचारावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

मुंबईतील ८६२ लपलेले मृत्यू उघडकीस आल्यानंतर मुंबईतील करोना मृत्यूदर ३.४ वरून ५.७ वर गेला. त्यानंतर आम्हाला काहीच लपवायचे नाही असे सांगत मुंबईतील सर्वच शिल्लक करोना मृत्यूंची माहिती सोमवारपर्यंत स्पष्ट होईल, असे आयुक्त चहेल यांनी सांगितले. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी उपचार व गतिमान उपचार यंत्रणा राबविण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयातील मृत्यूदर हा २५ टक्के तर शीव रुग्णालयात २३ टक्के आणि नायर रुग्णालयात १२ टक्के करोना रुग्णांचा मृत्यूदर असल्याचे आढळून आले आहे. काही अन्य पालिका रुग्णालयातील मृत्यूदर हाही ११ ते १८ टक्यांच्या आसपास असून याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केइएम, नायर व शीव रुग्णालयात येणारे करोना रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त असताना मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न पालिकेच्याच काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.

या पार्शभूमीवर राज्य शासनाच्या जे जे रुग्णालय, सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयातील मृत्यूदर हा ११.८ टक्के एवढा आहे. तर राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील करोना मृत्यूदर मुंबई महापालिका रुग्णालयांतील मृत्यूदरापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील मृत्यूदर यापूर्वी खूपच जास्त होता तो कमी करून २६ वर आणण्यात आला तर औरंगाबाद व सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील मृत्यूदर १६ च्या आसपास असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

जे जे सह राज्यातील १८ शासकीय रुग्णालयातील करोना रुग्णांवरील उपचार व मृत्यूदर याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना विचारले असता ते म्हणाले, “करोना रुग्णांचे मृत्यू कमी व्हावे हे आपले धोरण असून उपचाराची दिशा योग्य आहे की नाही, गंभीर रुग्णांवरील उपचार योग्य होतात की नाही तसेच मृत्यूची कारणमिमांसा करून सुयोग्य उपचार करण्याचे काम आम्ही करतो. यासाठी १८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रमुख डॉक्टरांची एप्रिल व मे महिन्यात रोजच्या रोज आढावा बैठक घेतली जायची. गंभीर रुग्णांवरील उपचारांचा आढावा घेण्यासाठी चार प्राध्यापकांची एक समिती नियुक्त केली आहे.”

“जे जे रुग्णालयाच्या औषध विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या नागर, पुण्याच्या डॉ. बोरसे व डॉ. बी. डी. कदम तसेच नागपूर येथील डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य व डॉ. सतीश गोसावी यांची नियुक्ती केली आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर करोना रुग्णांच्या उपचाराचा रोजच्या रोज आढावा घेतला जातो. तसेच दर सोमवारी उपचारात काही नवीन बदल करावयाचे असल्यास ही समिती सर्वांशी चर्चा करून बदल सुचवते. आयसीएमआर तसेच टास्क फोर्सच्या संपर्कात राहून नवीन बदलांचा आढावा घेतला जातो. जूनपासून आम्ही आठवड्यातून चार वेळा व्हिडिओ कॉन्फरन्स घेत आहोत. या बैठकीत मृत्यूच्या कारणांचाही सखोल विचार करून गंभीर रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठीच्या उपाययोजना निश्चित केल्या जातात. याच्यामुळे आम्ही जास्तीतजास्त रुग्णांना वाचवू शकतो,” असे डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

केइएममधील रुग्ण अतिगंभीर अवस्थेतील

केइएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना रुग्णालयातील २५ टक्के मृत्यूदर विषयी विचारले असता, आमच्याकडे येणारे जवळपास सर्व रुग्ण हे गंभीर व अतिगंभीर अवस्थेतील असतात असे सांगितले. “केइएम जवळच टाटा कर्करुग्णालय असून करोनाची लागण असलेले कर्करुग्ण मोठ्याप्रमाणात आमच्याकडे दाखल होतात. या रुग्णांची एकूणच परिस्थिती गंभीर असते त्यात करोनाबाधित झाल्याने त्यांच्यावरील उपचार हे एक मोठे आव्हान असते. यासाठी आमच्याच रुग्णालयातील वेगवेगळ्या विषयातील सात तज्ज्ञ डॉक्टरांची समिती आम्ही नेमली असून प्रत्येक रुग्णाचा रोजच्या रोज आढावा घेतला जातो. केइएम मध्ये सक्षम नियंत्रण कक्ष असून एका जागेवर बसून मी स्वत: प्रत्येक वॉर्डमध्ये काम सुरु आहे त्याचा आढावा घेऊ शकतो. याशिवाय दर आठवड्याला आम्ही सर्वजण मृत्यूच्या कारणांचा व उपचारांचा आढावा घेत असतो,” असंही त्यांनी नमूद केलं.

“केईएमध्ये ४८५ आयसीयू बेड असून प्रत्येक बेडच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे. अनेकदा खाजगी रुग्णालयातून अतिगंभीर झालेला रुग्ण आमच्याकडे पाठवला जातो. तर बहुतेक रुग्ण हे कर्करोगग्रस्त आहेत. त्यामुळे अन्य कोणत्याही रुग्णालयातील मृत्यूदर व आमच्याकडील मृत्यूदर यांची तुलनाच करता येणार नाही, असे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. याशिवाय टास्क फोर्स बरोबर आमचा नियमित संवाद असतो. उपचाराचा विचार करता आमचे डॉक्टर सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात,” असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

नायरमधील मृत्यूदर १२

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, “आमच्याकडील मृत्यूदर हा १२ एवढा असून मृत्यूदराचा विचार करता दोन प्रकारे मृत्यूंची वर्गवारी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे पहिल्या २४ तासातील मृत्यू व अन्य मृत्यू. बहुतेक वेळा खाजगी रुग्णालयातून शेवटच्या टप्प्यातील म्हणजे मृत्यूच्या दारात असलेले रुग्ण आमच्याकडे पाठवले जातात. आम्ही कोणताच रुग्ण नाकारत नाही. मात्र हे शेवटच्या टप्प्यातील अतिगंभीर रुग्ण चोवीस तासात मृत्यू पावतात आणि आमचा मृत्यूदर वाढलेला दिसतो. अन्यथा सुरुवातीलाच आलेले व बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांचेच प्रमाण आमच्याकडे जास्त आहे. नायर रुग्णालय हे करोना रुग्णालय म्हणून जाहीर केले असून आज आमच्याकडे करोना रुग्णांसाठी १०४९ बेड आहेत तर अतिदक्षता विभागात ११० बेड आहेत. आमच्याकडील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांचे नियमित परिक्षण करतात. गंभीर रुग्णांवरील उपचारांचा नियमित आढावा घेतला जातो.” टास्क फोर्समधील डॉक्टरांबरोबर संवाद असतो व आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचाही योग्य वापर केला जातो. आमच्याकडे औषधांचा पुरेसा साठा असून आमच्या सर्व रुग्णालयातील डॉक्टर सक्षम असल्याने व प्रत्येक ठिकाणची रुग्ण परिस्थिती वेगळी असल्याने केईएम, शीव व नायर रुग्णालयांसाठी एकत्रित तज्ज्ञांची समिती असण्याची गरज नसल्याचे डॉ. मोहन जोशी म्हणाले. शिवाय आयुक्त स्तरावर नियमित आढावा बैठक होत असून आगामी काळात मृत्यूदर आम्ही निश्चित कमी करू असा विश्वासही डॉ. मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

… म्हणून मृत्यूदर वाढलेला दिसतो

“मुंबईतील शिल्लक मृत्यूच्या संख्येमुळेच मुंबईतील मृत्यूदर वाढलेला दिसतो. अन्यथा प्रत्यक्षात तो कमीच आहे हे मुंबईतील रोजच्या मृत्यूच्या संख्येवरून स्पष्ट होते,” असे केईएमचे माजी अधिष्ठाता व पालिकेच्या ‘डेथ ऑडिट समिती’चे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. “साधारणपणे मे पासून करोना रुग्णांवरील उपचाराला एक दिशा मिळू लागली. कोमॉर्बीड रुग्णांना प्रभावी उपचार व महागडी जीवनावश्यक औषध पालिका रुग्णालयात उपलब्ध झाली. यातून बर्यापैकी मृत्यू कमी होऊ लागतील. याशिवाय दर आठवड्याला मृत्यूंची कारणमिमांसा केली जात असून उपचाराची नवीन मार्गदर्शक तत्वे वापरल्याने उपचारात गती येऊ शकते,” असे डॉ. अविनाश सुपे म्हणाले.
महापालिका रुग्णालयातील उपचारात गती आली असली, नवीन परिणामकारक औषधे उपलब्ध असली व रुग्णोपचाराचा नियमित आढावा घेऊन उपचार केले जात असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांचे म्हणणे असले तर मग रोजच्या रोज मागील काळातील मृत्यूंची नोंद नव्याने का दाखवावी लागते हा प्रश्न अनुत्तरित राहातो. करोनामृत्यूंच नियमित डेथ ऑडिट का झाले नाही व याला जबाबदार कोण याबाबत सारेच मौन बाळगून आहेत.