– प्रसेनजीत इंगळे
वसई विरार मध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत असताना अर्नाळा परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील एक करोना बाधित रुग्णाच्या मयताला शेकडो लोकांनी हजेरी लावली. यामुळे आता अर्नाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या रुग्णांच्या मृत्यू नंतर त्यांचे करोना चाचणीचे अहवाल हाती आले नसतानाही रुग्णलयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. आणि नातेवाईकांनी मोठ्या गर्दीत त्यांचे अंत्यसंस्कार उरकलया नंतर त्यांच्या करोना चाचणी अहवाल सकारात्मक असल्याची माहिती मिळाली.

अर्नाळा येथे राहणारे ५८ वर्षीय प्रतिष्ठित गृहस्थ यकृताच्या आजारासाठी वसईच्या कार्डिनल ग्रेसीस (बंगली) रुग्णालयात उपचार घेत होते. गुरुवारी  पहाटे  उपचारा  दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णलयाने त्यांचे नमुने कोविड १९ च्या चाचणीसाठी पाठवले होते. पण त्यांचा अहवाल येण्याच्या आधीच रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला.

गुरुवारी सकाळी १० चा अर्नाळा येथे या मृतदेहावर अतिशय सामान्य स्वरूपात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सुमारे पाचशेहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता, अशी माहिती एका गावकऱ्याने दिली.या गावातील १७ जण आधीच करोनाबाधित असताना, रुग्णलयाने कोविड चाचणी अहवाल आला नसताना मृतदेह ताब्यात दिला कसा असा सवाल निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कार्डिनल ग्रेसीस रुग्णालयाच्या महाव्यवस्थापक फ्लोरी डिमेन्डो यांनी सांगितले की, रुग्णाला कोणतीही कोविडची प्रभावी लक्षण दिसून येत नव्हती. त्याच बरोबर आमच्या कडे मुतदेह ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे नातेवाईकांच्या मागणीमुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.  तर वसई तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी माहिती दिली की, आम्ही रुग्णालयाला नोटीस बजावत आहोत. त्याच प्रमाणे योग्य चौकशी घेऊन आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.

त्यांच्या कोविड चाचणी अहवाल नंतर आता अर्नाळा परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यसंस्कारासाठी केवळ अर्नाळा नाही तर आसपासच्या अनेक गावातुन नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सध्या प्रशासनाकडून या अंत्यसंस्कारासाठी कोण कोण आले होते याची माहिती घेणे सुरू आहे. पण यामुळे आता करोना रुग्णाच्या संख्येत मोठी भर पडणार याची भीती व्यक्त केली जात आहे.