News Flash

रेमडेसिवीरच्या वापराने मृत्यूदर कमी होत नाही- डॉ राहुल पंडित

"दुर्दैवाने 'अर्थपूर्ण' कारणांसाठी बहुतेक डॉक्टर हे सत्य सांगत नसावे"

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

रेमडेसिवीरमुळे करोनाचे मृत्यू टाळता येतात याचा कोणताही पुरावा आजवरच्या वैद्यकीय अभ्यासात आढळून आला नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातही रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यूदरात कुठेही घट झाल्याचे आढळून आले नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीरच्या मागणीसाठी आक्रोश सुरु आहे. एकीकडे करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिवीर मागण्याचा सपाटा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लावला आहे. प्रामुख्याने खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला की डॉक्टर नातेवाईकांना तात्काळ रेमडेसिवीर आणायला सांगतात. यातून रेमडेसिवीर मिळाले तरच आपल्या रुग्णाचा जीव वाचू शकतो ही भावना रुग्णांच्या नातेवाईंकांच्या मनात निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी रेमडेसिवीर लिहून दिले म्हणजे ते आता सरकारने तात्काळ उपलब्ध करून दिलेच पाहिजे अशी भावना निर्माण झाली असून यातूनच नातेवाईकांचा आक्रोश निर्माण झाल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुळात रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू टाळता येतो हे सत्य नसल्याचे सांगणे ही उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नैतिक जबाबदारी आहे. दुर्दैवाने ‘अर्थपूर्ण’ कारणांसाठी बहुतेक डॉक्टर हे सत्य सांगत नसावे अशी शंका वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

रेमडेसिवीर बनविणाऱ्या एकूण सात कंपन्या असून या इंजेक्शनची छापील किंमत चार हजार रुपये ते ५४०० रुपये असली तरी कंपनीकडून वितरकांना रेमडेसिवीर ८०० ते १२०० रुपयांना दिले जाते. बहुतेक खासगी रुग्णालयांची स्वतः ची फार्मसी असल्याने रुग्णाला सहा रेमडेसिवीर दिल्यास किमान नफा हा ३० ते ४० हजार प्रतिरुग्णापाठी होतो. रेमडेसिवीर कोणत्या रुग्णाला वापरावे याची सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे राज्य करोना कृती दलाने निश्चित केली असून त्याची माहिती सर्व डॉक्टरांकडे असल्याचेही कृती दलातील एका डॉक्टरांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर नेमके का दिले जात आहे व रेमडेसिवीरमुळे मृत्यू टाळता येत नाही याची सुस्पष्ट कल्पना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली असती तर लोकांचा एवढा आक्रोश निर्माण झाला नसता असेही कृती दलाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण वाढत असताना रोज केवळ ५० हजार रेमडेसिवीर उपलब्ध होत असून ते प्रत्येक जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या प्रमाणात त्याचे वाटप केले जाते असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. एकूणच रेमडेसिवीरचा करोना रुग्णांच्या उपचारातील उपयोगाविषयी राज्य कृती दलाचे सदस्य व मुलुंड येथील फोर्टिज रुग्णालयातील डॉक्टर राहुल पंडित यांना विचारले असता, रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यू टाळता येईल असा कोणताही आधार आजवरच्या अभ्यासात आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाचा रुग्णालयातील वा अतिदक्षता विभागातील कालावधी एक ते तीन दिवस कमी करण्यास याची मदत होते असेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचा वापर पहिल्या दहा दिवसात केला पाहिजे. तसेच लक्षण नसलेल्या वा अतिगंभीर रुग्णाला रेमडेसिवीर देऊन काही उपयोग नाही असे सांगून डॉ राहुल पंडित म्हणाले, मॉडरेट ते गंभीरतेकडे जाणार्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यास त्याचा उपयोग होतो असे दिसून आले आहे. एकूण पाच दिवसांचा हा कोर्स असून सहा रेमडेसिवीरपेक्षा जास्त रेमडेसिवीर देऊ नयेत असेही डॉ. पंडित यांनी सांगितले. याबाबत राज्य कृती दलाची मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध असून त्याचा वापर करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंधनकारक आहे.

राज्य कृती दलाचे मृत्यू कारणमिमांसा विश्लेषण प्रमुख व हिंदुजा रुग्णालयाचे प्रमुख डॉ अविनाश सुपे म्हणाले, रुग्णाला पहिल्या दहा दिवसांच्या आत रेमडेसिवीर दिल्यास त्याचा नक्की फायदा होतो. मात्र रेमडेसिवीर मृत्यूदर कमी करता नाही. अर्थात याचा वापर करताना रुग्णाची ऑक्सिजन पातळी, एचआर सिटी अहवाल व अन्य बाबी विचारात घेणे अपेक्षित आहे. रेमडेसिवीरचा उपयोग व्हायरल लोड कमी करण्यासाठी होतो मात्र मृत्यू टळतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट असल्यामुळे ते कोणाला द्यावे व कोणाला देऊ नये याची मार्गदर्शक तत्वे राज्य कृती दलाने वेळोवेळी प्रसिद्ध केली असल्याचे डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी असेल तसेच सिटी स्कॅन अहवाल आणि रुग्ण अति गंभीरतेकडे वाटचाल करत असेल तर अशा रुग्णाला सहा रेमडेसिवीर दिले जातात असे सांगून वैजापुर येथील डॉ अमोल अन्नदाते म्हणाले, रेमडेसिवीरच्या वापराने रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी तीन दिवसांपर्यंत कमी होतो. एक नक्की की, रेमडेसिवीर दिल्याने मृत्यू टळतो असे आजवरच्या कोणत्याही संशोधनातून पुढे आलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातही रेमडेसिवीर दिल्यामुळे मृत्यू कमी होण्यास अथवा व्हेंटिलेशनमध्ये घट होत असल्याचे पाच चाचण्यांमधून आढळून आलेले नाही. रेमडेसिवीरच्या उपयुक्ततेबाबत एकूण पाच चाचण्या करण्यात आल्या असून यात रुग्णाच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते हे आढळून आले आहे. मात्र रुग्णाच्या रुग्णालयीन कालावधीत घट झाल्याचे आढळून आले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. याबाबतचा अभ्यास अजूनही सुरु असून यातून उपलब्ध होणाऱ्या माहिती व आकडेवारीचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे नव्याने मांडण्यासाठी केला जाईल, असेही ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 2:52 pm

Web Title: coronavirus doctor rahul pandit says remdesivir use dosent help to decrease death rate sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना रुग्णांवरील उपचारासाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल
2 मुंबईसाठी दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन
3 मुंबईत दिवसभरात ९,९२५ नवे रुग्ण
Just Now!
X