पावणेचार लाख जणांकडून आठ कोटींची दंडवसुली

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बंधनकारक करण्यात आलेल्या मुखपट्टीविनाच फिरणाऱ्या तब्बल तीन लाख ७२ हजारांहून अधिक व्यक्तींवर पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्यावरील कारवाईतून तब्बल ७ कोटी ८० लाखांहून अधिक रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. करोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आली असून बहुतांश कार्यालये, दुकाने, मंडया, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्यातच गणेशोत्सवापाठोपाठ आलेल्या दिवाळीनिमित्त मुंबईकरांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. सुरुवातीला मुखपट्टीविना फिरणाऱ्या मुंबईकरांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येत होता. मात्र दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे पालिका कर्मचारी आणि मुखपट्टीविना फिरणाऱ्यांमध्ये वाद वाढू लागले होते. ही बाब लक्षात घेऊन दंडाची रक्कम २०० रुपये करण्यात आली.

मुंबईत आतापर्यंत मुखपट्टीविना फिरणाऱ्या तब्बल तीन लाख ७२ हजार ०८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या मंडळींकडून तब्बल सात कोटी ८० लाख ३० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘परिमंडळ-२’ म्हणजेच परळ (एफ-दक्षिण), माटुंगा (एफ-उत्तर), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण) आणि दादर (जी-उत्तर) या भागात सर्वाधिक, ६७,५६९ व्यक्ती मुखपट्टीविना फिरताना आढळल्या असून त्यांच्याकडून दंडाच्या रूपात एक कोटी ३८ लाख ४५ हजार १०० रुपये वसूल करण्यात आले. चेंबूर पूर्व (एम-पूर्व) आणि चेंबूर पश्चिम (एम-पश्चिम) परिसराचा समावेश असलेल्या ‘परिमंडळ – ५’मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ४०,९९४ व्यक्तींवर कारवाई करून ८४ लाख १५ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेचीही कारवाई

लोकल प्रवासात मुखपट्टी न घालणाऱ्या ८६७ प्रवाशांवर कारवाई करत रेल्वेने १ लाख ९५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांतर्गत सर्वाधिक २०७ विनामुखपट्टी प्रवाशांवर कारवाई केली आहे. उपनगरीय मार्गावरूनही प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा अधिकार लोहमार्ग पोलिसांना दिल्याचे पालिकेच्या मदतीने रेल्वे स्थानक हद्दीत कारवाई सुरू आहे. लोकल प्रवासादरम्यान मुखपट्टी न घालणाऱ्या आणि शारीरिक अंतर राहणार नाही असे कृत्य करून अन्य प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या प्रवाशांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अशा ८६७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ३ प्रवाशांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई झाली. आतापर्यंत सीएसएमटी पोलीस ठाणेअंतर्गत सर्वाधिक २०७, त्यापाठोपाठ अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत २०१, मुंबई सेंट्रल ११९, तर बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणेअंतर्गत ९२ विनामुखपट्टी प्रवासी पकडले आहेत. या प्रवाशांना २०० रुपये याप्रमाणे दंड केला जातो.