नगरसेवकांची मागणी; दंडाची रक्कम वाढवण्याची सूचना

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुखपट्टीविना सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र दंडवसुलीनंतर संबंधित व्यक्तीला पालिकेने एक मुखपट्टी भेट स्वरूपात द्यावी, अशी मागणी आता नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. भेट स्वरूपात मिळणाऱ्या मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या व्यक्तीकडून दुप्पट दंड वसूल करावा, असेही त्यांनी सूचित के ले आहे.

करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र असे असले तरीही अनेक व्यक्ती मुखपट्टीविनाच फिरताना दिसतात. पालिकेने तैनात केलेली पथके मुखपट्टीविना फिरणाऱ्या व्यक्तींकडून २०० रुपये दंड वसूल करीत आहेत. दंडात्मक कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्तीला मुखपट्टी भेट द्यावी, अशी सूचना करणारे निवेदन काँग्रेसच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सादर केले आहे. मुखपट्टी भेट स्वरूपात दिल्यानंतरही संबंधित व्यक्ती दुसऱ्यांदा मुखपट्टीविना फिरताना आढळल्यास त्याच्याकडून दुप्पट दंड वसूल करावा, असेही त्यांनी निवेदनात सूचित केले आहे.

पालिकेच्या दंडात्मक कारवाईमुळे मुंबईकरांना शिस्त लागत आहे, परंतु काही मंडळी मुखपट्टीशिवाय फिरत आहेत. त्यांनाही शिस्त लावण्याची गरज आहे. त्यामुळे वरील उपाययोजना करावी. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अधिक महसूल जमा होईल आणि नागरिकांना मुखपट्टी वापरावीच लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.