२१ दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या २१ दिवसात घरी असतो तर काय केलं असतं तुम्हाला पहायचंय का?, असं म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. अर्थात आपल्यासारख्या घरात बसलेल्यांना या इच्छा अगदीच साध्या वाटतील मात्र खरोखरच पोलिसांनी व्यक्त केलेल्या इच्छा ऐकून आपण किती नशिबवान आहोत याची जाणीव होईल.

या व्हिडिओमध्ये काही महिला पोलीसांबरोबर पोलीस अधिकारीही ‘मी २१ दिवस घरी असतो तर काय केलं असतं?’ या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहेत. ‘आम्ही घरातून बाहेरच येणार नाही’ असं मास्क लावलेली व्हिडिओतील पहिलीच महिला पोलीस हवालदार सांगताना दिसते. “पोलिसांना कुटुंबाला वेळ देत येत नाही. त्यामुळे अशी संधी मिळालीच तर आम्ही नक्कीच कुटुंबाला वेळ देऊ,” असं त्या सांगतात. तर एक पोलीस अधिकाऱ्याने “मला अशी संधी मिळाली असती तर मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवला असता,” अशी इच्छा व्यक्त केली. “जर मी घरी असते तर मी घरच्यांसोबत म्हणजेच माझी आईबरोबर, बहिणींबरोबर वेळ घालवला असता. पुस्तकं वाचली असती. चित्रपट पाहिले असते,” असं एक महिला पोलीस हसत हसत सांगताना दिसते.

“घरी असतो तर मी पुस्तकं वाचली असती, मुलांबरोबर खेळतो असतो,” असं मास्क लावलेला एक पोलीस हवालदार व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो. तर एक महिला पोलीस अधिकारी विवाहित असल्याने मी नवऱ्याला वेळ दिला असता असं सांगते. “माझं लग्न झालं आहे. मात्र मला माझ्या नवऱ्याला वेळ देता येत नाही. आता इथे २४ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे २१ दिवस मिळाले असते तर मी माझ्या नवऱ्याला वेळ दिला असता. घरात वेळ घालवला असता,” असं ही महिला सांगते. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने “मला सुट्टी असती तर मी माझ्या पत्नीबरोबर, घरातील पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवला असता. खूप झोपा काढल्या असत्या”, असं सांगितलं. “मी घरच्यांबरोबर वेळ घालवला असता, जेवण बनवलं असतं, झोपले असते, चित्रपट पाहिले असते, मस्त वेळ एन्जॉय केला असता,” असं महिला हसत हसत सांगताना दिसत आहे.

शेवटचं आवाहन अत्यंत महत्वाचं

व्हिडिओच्या शेवटी पोलिसांनी एक आवाहन केलं आहे. “खूप साध्या इच्छा आहेत नाही यांच्या. मात्र मुंबई सारख्या स्वप्न नगरीची कोणतीही स्वप्न अपूर्ण राहू नयेत म्हणून त्यांना या इच्छा पूर्ण करता येत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पुर्ण करता यावी म्हणून ते बाहेर आहेत. त्यामुळेच त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करणार नाही का? त्यांची सर्वात मोठी इच्छा हीच आहे की मुंबई आणि मुंबईकरांनी करोना आणि त्यासारख्या इतर सर्व धोक्यांपासून सुरक्षित रहावं. कराल ना त्यांना मदत?” असा सवाल पोलिसांनी मुंबईकरांना विचारला आहे.

या व्हिडिओला अभिनेत्री आलिया भट्टनेही हा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. “तुमच्या बद्दलचं प्रेम आणि आदर आम्ही शब्दात मांडू शकत नाही,” असं आलियाने म्हटलं आहे.

या व्हिडिओला चार हजार ९०० हून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर जवळजवळ सव्वा चार लाख व्ह्यूज या व्हिडिओला आहेत.