लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: बेस्ट उपक्रमामध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. एकूण २ हजार ८३५ पैकी २ हजार ६९० बाधित करोनामुक्त झाले असून यातील ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून काही कर्मचारी विलगीकरणात आहेत.

अत्यावश्यक सेवेसाठी करोनाकाळात बेस्टच्या परिवहन सेवेबरोबरच वीज विभागातील कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे परिवहन सेवेतील जवळपास ६० ते ७० टक्के चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर परिवहन सेवा, बेस्टमधील अभियंता विभाग, सुरक्षारक्षक आणि अन्य विभागातील कर्मचारी आहेत. सध्याच्या घडीला बेस्टमधील ५० पैकी ४० कर्मचाऱ्यांना सौम्य व अतिसौम्य लक्षणे आहेत, तर यातील उर्वरित दहा जण हे ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय ४८ कर्मचारी संशयित असल्याने त्यांना विलगीकरणात ठेवले आहे.

आतापर्यंत ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हीच संख्या ३७ होती. ही संख्या जास्त असल्याचा दावा बेस्टमधील संघटनांनी केला आहे, परंतु बेस्ट उपक्रमाकडून अद्याप ५२ मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. उपक्रमात करोना झालेल्या कर्मचाऱ्यांनी एक ते तीन महिनेही उपचार घेऊन त्यावर मात केल्याचीही नोंद आहे.