कर्जफेड सवलत संपल्यावर अडचणीत वाढ

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिने झाले तरी राज्यभरातील मालवाहतूकदारांच्या व्यवसायास उठाव मिळत नसून, केवळ ४० टक्के वाहनेच सध्या कार्यरत आहेत. तर ऑगस्टअखेर कर्ज हप्ते न भरण्याची सवलत संपल्यानंतर सप्टेंबरपासून या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आकडेवारीनुसार राज्यातील छोटय़ा-मोठय़ा मालवाहतूक वाहनांची संख्या सुमारे १६ लाख आहे. बंदर आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे राज्यातील ही संख्या देशात सर्वाधिक आहे. टाळेबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा वाटा केवळ १५ ते २० टक्के इतका होता. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दोन महिन्यांत मालवाहतुकीत केवळ २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली.

‘सध्या मालवाहू वाहनांची मागणी खूपच कमी असून, केवळ ४० टक्केच वाहने वापरात आहेत. उर्वरित वाहने एकाच जागी थांबल्याचे, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी सांगितले.

सध्या बँकांनी ऑगस्टअखेर कर्ज हप्ते न भरण्याची सवलत दिली आहे. मात्र ही मुदत संपल्यानंतर वाहनमालकांवर आर्थिक संकट कोसळेल, असे बाल मलकित सिंह यांनी सांगितले.  राष्ट्रीय वाहतूक परवाना कर, रस्ता कर आणि विमा यासाठी सर्व पैसे यापूर्वीच भरले आहेत. वाहतूकच ठप्प असण्याच्या काळापुरती यामध्ये मुदतवाढ मिळावी अशी मागणी सर्व वाहतूकदार संघटनांकडून केली जात आहे, मात्र त्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यात पुन्हा डिझेलच्या किमती वाढल्याने खर्च वाढला आहे.

दुसरीकडे आयातीचे प्रमाण कमी असल्याने निर्यातीसाठी कंटेनर उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते. जहाजातून आलेले आयातीचे कंटनेरच पुन्हा निर्यातीसाठी वापरले जातात. तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे पदाधिकारी अश्विन शहा यांनी दिलेल्या माहीतीनुसार, अनेक मालवाहतूक जहाज कंपन्यांकडून व्यापाऱ्यांकडे तांदळासाठी कंटेनरच पाठवले जात नाहीत. त्यामुळे निर्यात करण्यासाठी माल उपलब्ध असला तरी त्याला उठाव नाही.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील मालवाहतूकदारांच्या संघटनेच्या आकडेवारीनुसार केवळ २० ते २५ टक्के इतक्याच मालवाहतूक वाहनांना सध्या मागणी आहे. महाराष्ट्र हेवी व्हेईकल अ‍ॅण्ड इंटरसेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनतर्फे सुमारे १८ हजार मालवाहने आयात-निर्यातीसाठी मालवाहतूक करतात. ‘टाळेबंदीपूर्वी नोंदविलेल्या मागणीनुसार येणारा आयात माल तीन महिन्यांपूर्वीच आला. त्यानंतर आयात मोठय़ा प्रमाणात घटली. तसेच निर्यातीमध्ये केवळ कांदा, मसाले आणि औषधे यांचा समावेश आहे. उद्योगधंद्यामार्फत होणारी आयात-निर्यात जवळपास ठप्पच असल्याचे,’ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी सांगितले. सर्वत्र आर्थिक गाडा रखडत असल्याने मालवाहतुकीचे पैसेदेखील व्यापाऱ्यांकडून वेळेवर मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांकडे आधीचाच माल मोठय़ा प्रमाणात शिल्लक आहे. त्यातच कधी कडक टाळेबंदी, कधी शिथिलता यामुळे नवीन मालाला मागणीच नसल्याने मालवाहतुकीची गरज कमी असल्याचे,  व्यापारी संघटनेचे मोहन गुरुनानी यांनी सांगितले.

‘सध्या काम नाही, परत येऊ नका’

मालवाहतूक व्यवसायातील चालक, कार्यालयीन कर्मचारी आणि मालाची चढ-उतार करणारा श्रमिक वर्ग यामध्ये स्थलांतरितांचे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. गेल्या दोन महिन्यांत काही स्थलांतरितांना विविध व्यावसायिक पुन्हा बोलावत आहेत. मात्र मालवाहतुकीमध्ये कामच कमी असल्याने  स्थलांतरितांना मालवाहतूकदार सध्या तिकडेच थांबण्यास सांगत आहेत.