निलेश अडसूळ, लोकसत्ता

एखाद्या गावात प्रवेश केल्यावर देवळाचे दर्शन होते, तसे धारावीत कुठल्याही बाजूने प्रवेश केला तर सर्वात आधी दर्शन घडते ते सार्वजनिक शौचालयाचे. पूर्वेला शीव, पश्चिमेला माहीम, उत्तरेला वांद्रे, दक्षिणेला माटुंगा अशा कोणत्याही दिशेने आलात तरी तुम्हाला त्यांचं दर्शन घडेलच. पण ही शौचालयेच धारावीच्या करोनाप्रसारातील अवघड जागेचं दुखणं बनली आहेत. करोनाकाळात सामाजिक अंतराचे धडे कानोकानी पोहोचले. पण ज्यांच्या जगण्यातच फुटभराचं अंतर आहे, त्यांनी ते कसे पाळावे?  सार्वजनिक शौचालये हा यातला कळीचा मुद्दा.

सकाळच्या सुमारास शीव स्थानकाकडून सुरू होणारा धारावीचा बाजार टाळेबंदी काळातही अंगाला अंग लागेल असा तुडुंब भरलेला असतो. बाजारातील एक वाट केळ्याच्या वखारीकडे जाते. तिथले मजूर आपापल्या गावी गेल्याने वखार शांत आहे. पण तिला लागूनच असलेल्या लक्ष्मीबाग, पत्राचाळींमध्ये जाग दिसते. पत्रा चाळीच्या प्रवेशालाच रस्त्यावर एक शौचालय लागते. आम्ही गेलो तेव्हा शौचालयाबाहेर दोन-तीन बायका, पाच-सहा पुरुष प्रतीक्षेत होते. त्यातल्या एका दोघांच्या नाकातोंडावर रूमाल, टॉवेल असं काहीसं गुंडाळलेलं होतं. बाकीचे दोघेतिघे विडय़ांच्या धुराची वलये हवेत धाडत आपला नंबर येण्याची वाट बघत होते. एकाला विचारलं, ‘हे शौचालय किती चाळींसाठी आहे?’ त्यावर ‘पत्राचाळीतले चारशे आणि आजूबाजूच्या दोन चाळी, समोरच्या टाटा पॉवरचे मिळून हजारेक जण इथेच येतात,’ असं उत्तर त्यानं दिलं. करोनाची परिस्थिती भयाण बनत चालली असतानाही..? या प्रश्नावर तो उत्तरला, ‘कुणाला अडवणार? चाळीत करोनाचे सहाजण सापडलेत. पण सगळय़ांसाठी एकच शौचालये. त्यामुळे सकाळी मोकळं व्हायला जायचीही भीती. अजून निर्जंतुकीकरणही झालेलं नाही.’

पुढे काही अंतरावरच नूर, अमिनाबाई, गांधी, सरबत चाळ यांच्या मधोमध एक शौचालय दिसलं. इथंही शौचालयाबाहेर बरीच गर्दी होती. पण शौचालयाला पडदा लावून आडोसा तयार केलेला. ‘बायकांच्या शौचालयाचं काम सुरू आहे. त्यामुळे पुरुषांच्याच शौचालयाच्या काही भागाला पडदा लावून तिथं महिलांची सोय केली आहे,’ एका चाचानं माहिती पुरवली. बारा शौचकुपांचं हे शौचालय दिवसभरात चारशेहून अधिक जण वापरतात. ‘सध्या अनेक मजूर गावी गेल्यानं गर्दी कमी आहे. नाहीतर यावेळेस मोठी रांग दिसते. सरकारनं गर्दी करायची नाही, असं बजावलंय. म्हणून आम्ही गर्दी कमी झाली की जातो. पण दुपापर्यंत तशी वेळ येत नाही,’ तिथलीच एक महिला उद्गारली.

पुढे नूर, अमिनाबाई, गांधी, सरबत चाळ यांच्या मध्यवर्ती एक शौचालय दिसलं. इथे मोठी मुस्लीम वस्ती आहे. शौचालयाबाहेर बरीच गर्दी होती. पण शौचालयाला पडदा लावलेला. शेजारच्या घरात चौकशी केली तर एक चाचा म्हणाले, ‘गेली काही महिने बायकांच्या शौचालयाचे काम सुरू असल्याने पुरुषांच्याच शौचालयात पडदा लावून महिलांची सोय केली आहे.’ बारा खणाचे हे शौचालय दिवसभरात चारशेजण तरी वापरत असतील. तिथल्या एक चाची म्हणाल्या, ‘आता मजूर गावी गेले म्हणून गर्दी कमी आहे. नाहीतर या वेळेस मोठी रांग असते. आता गर्दी करायची नाही असं सांगितलंय सरकारनं. म्हणून आम्ही गर्दी कमी झाली की जातो. कधीकधी दुपापर्यंत वाट पहावी लागते.’ तिथल्याचं एका वयस्कर महिलेनं आपली व्यथा मांडली.

धारावीतील लक्ष्मीबाग, काळाकिल्ला, पारशीचाळ, डीगला, बगीचा या वस्त्यांमध्ये बऱ्यापैकी मराठीभाषिक वस्ती आहे. तिथं पोहोचेपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. ‘आमदार वर्षांताई गायकवाड यांच्या निधीतून’ असं लिहिलेल्या एका शेडखाली काही पन्नाशीतल्या बायका निवांत बसल्या होत्या. त्याभागात बरेच करोनाचे रुग्ण सापडल्याने, सार्वजनिक शौचालयाची काय स्थिती आहे, तुम्हाला भीती वगैरे वाटते का, असं विचारलं, तसं त्यांच्यातल्या एकीने उत्तर दिलं, ‘आता घाबरून कुठं पोटातली कळ मारता येती व्हय. आता एवढी माणसं जातायत. त्यांच्यामागं आपला नंबर.’ दुसरीनेही री ओढली, ‘म्हंजी औषध देत्यात हातावर. साफसफाई असती. पण त्याचं एका टायमाला दोन रुपये द्यावं लागत्यात. अन बिघडलं तर आठ काय आणि दहा काय.’

धारावीत २२५हून अधिक शौचालये आहेत. त्यातली बहुतांशी शौचालये कंत्राटदाराला दिलेली आहेत. पाणी तुमचे असेल तर दोन रुपये आणि पालिकेच असेल तर चार. असा रोख हिशोब. काही ठिकाणी दिल्या पैशाला जागत स्वच्छता केली जाते. मात्र काही ठिकाणी ती नावालाही नसते. पालिकेने दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करू म्हणून सांगितले. वास्तवात दोन दिवसांतून एकदा केले तरी खूप, अशी अवस्था.

पालिकेने जरी करोनामुक्तीचा नारा दिला असला तरी धारावीतील करोना आटोक्यात आणणं तसं कठीण आहे. कारण सामाजिक अंतर राखा असं कुणीही कितीही गळा काढून बोललं तरी ते अशक्य आहे. १२ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या इथल्या झोपडपट्टय़ांमध्ये दोन दारांमध्ये एका वितीचं तर समोरासमोर असलेल्या घरांमध्ये फुटभराचं अंतर आहे. त्यामुळे बाजारात, शौचालयातच नव्हे तर आजूबाजूला राहूनही सहज संसर्ग होऊ शकतो. अशाच एका अरुंद चाळीतून जाताना काही महिला घरांच्या उंबऱ्यावर बसून गप्पा करत होत्या. त्यापैकीच एकीला सामाजिक अंतराबाबत विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या, ‘आम्ही झोपडपट्टीत राहतो. एका घरात धा माणसं. दिवसभर घरात बसलो तर घरातच जीव जायचा. आम्ही बायका तासन्तास उंबऱ्यावर गप्पा मारत बसतो. गडी माणसं मैदानात, देवळात पत्ते खेळत बसतात. एरव्ही आम्ही बाजारात गेलो तरी तासभर घरी येत नाही. आता तर तिथंबी काठय़ा पडत्यात. मग जायचं कुठं?’ हे असं गुदमरणं इथल्या लोकांच्या पाचवीलाच पुजलेलं. करोनाबाधितांचा आकडा १६०० (मृत्यू ६०) पार गेलेल्या धारावीत राहणे लोकांना अवघड जागेचं दुखणं वाटू लागलं आहे. सहनही होईना अन सांगताही येईना..

संडासला जायचं म्हटलं तरी अंगावर काटा

या सगळ्यात भीषण चित्र साकीनाबाई चाळीत होते. येथे आठ करोनाबाधित आढळूनही तिथल्या शौचालयात पालिकेने निर्जंतुकीकरण केलेले नाही. सुरुवातीला भीतीने कु णी बोलायलाच तयार नाही. नंतर एका महिलेने संताप व्यक्त करत हकिकत सांगितली, ‘ज्यांच्या घरात पेशंट घावलाय ती बी इथच येत्यात आणि आम्हीबी तिथंच. संडासला जायचं म्हटलं तर अंगावर काटा येतो. झोपडपट्टीच जगणं हे असं.  ना नगरसेवक आमचा, ना आमदार. आमचं जगणं आम्हालाच माहीत.’ त्यांचा संताप स्वाभाविकच होता. कित्येक वर्षे इथली लोकं पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. निवडून येणाऱ्या प्रत्येक स्थानिक प्रतिनिधीने केवळ आश्वासनावर बोळवण केली.