मुंबईतील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाला एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आढळून येत असताना मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत ८०६ करोनाचे रुग्ण आढळून आले. मात्र, यावर विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. इतके कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारण समोर आणत फडणवीस यांनी प्रशासनावर नंबर ठीक ठेवण्याचा आरोप केला आहे. “केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

देशातील सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत असणाऱ्या मुंबईत मंगळवारी कमी बाधित रुग्ण आढळून आले. दिवसभरात ८०६ जण करोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, महापालिका प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारण आज पत्रकार परिषदेत सांगितलं. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरनं लक्षणं असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर चाचण्यांचे अहवाल २४ तासात कसे येतील, हे सुनिश्चित केले पाहिजे. लक्षणं असलेल्या रूग्णांच्या बाबतीत विलंबाने आलेला अहवाल हा प्राणघातक ठरू शकतो. खाजगी रूग्णालयांकडूनही मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट सुरू आहे. याकडेही राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,” अशी सूचना फडणवीस यांनी केली.

आणखी वाचा- Coronavirus: मुंबईत ९८४ जणांची प्रकृती गंभीर, कॉल सेंटरला दीड लाखांपेक्षा जास्त फोन

“नाशिक सध्या क्रिटीकल टप्प्यात आहे. त्यामुळे थोडं अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, प्रशासन काम करते आहे. पण, ते काम प्रत्यक्ष जमिनीवर पण दिसले पाहिजे. काल मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ ३३०० चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- बाळासाहेब ठाकरेंचा ‘सामना’ आता शिल्लक नाही, तोही अंतर्विरोधाने ग्रासला आहे – देवेंद्र फडणवीस

“जनतेने जाऊन स्वत: चाचण्या कराव्या, अशी अपेक्षा मुंबई महापालिका करीत असेल, तर त्यातून काहीही साध्य होणार नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणात चाचण्या प्रशासनाने करायला हव्यात. केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला? याची संपूर्ण माहिती याआधीच दिली आहे. त्यावर पुस्तिकाही काढली आहे. केंद्रावर दोषारोप करण्याऐवजी करोनाविरोधातील लढाईवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे,” असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.