News Flash

तळीरामांची तळमळ : “डॉक्टर काहीही करा, मला दारु मिळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्या”

मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव

मुंबई : डॉक्टर काहीही करा मला दारु मिळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्या… बघा हातपाय थरथरत आहेत… रात्रीची झोप लागत नाही… भलतीच स्वप्न पडतात… डॉक्टर काहीही करा थोडीतरी दारू मिळेल असे पाहा… असे अनेक आर्जव दारुसाठी तळमळणाऱ्या तळीरामांकडून मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांकडे करताना दिसत आहेत.

करोनामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्यापासून दारुची दुकाने व बार बंद झाले. काही चलाख तळीरामांनी अंदाज घेऊन काही प्रमाणात दारु खरेदी करून ठेवली. पण दिवसभर घरात बसावे लागत असल्याने साठा केलेली दारू संपली. मग सुरू झाली ती न संपणारी अस्वस्थता… ज्या तळीरामांना लॉकडाऊनचा अंदाज आला नाही, त्यांची अवस्था सध्या खुपच वाईट असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केरळमध्ये काही तळीरामांनी आत्महत्या केल्यामुळे तेथे सरकारने डॉक्टरांनी लिहून दिल्यास औषध म्हणून दारू देण्यास परवानगी दिल्याचा दाखला देत, आमच्याकडेही दारुच्या पुरते आहारी गेलेले लोक वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू लागल्याचे ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी सांगितले.

सुरुवातीला मित्रमंडळींकडे असेलेल्या ‘स्टॉक’च्या जिवावर यांनी काही दिवस ‘ढकलले’. आता या पक्क्या पिअक्कड लोकांची अवस्था खराब होऊ लागली आहे. माझ्याकडे उपचारासाठी अनेकजण फोनवरून विचारणा करतात तर काही जण रुग्णालयात येतात. आमचे हातपाय थरथरतात, झोप येत नाही, मनात भलतेसलते विचार येतात. काही संशयग्रस्त बनतात तर काहींना आजुबाजूला साप असल्याचे भास होतात, असे सांगून डॉ. जाधव म्हणाले हे विड्रॉवल सिम्टप्स (लक्षणं)आहेत. तंबाखू व सिगारेटचे व्यसन असलेल्या लोकांचीही काहीशी अशीच अवस्था होते.

आणखी वाचा- Lockdown : ‘काळ्या बाजारा’त चौपट भावात विकली जातेय दारू, हातभट्टीही जोरात!

करोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांमध्ये अस्वस्थता, नैराश्य तसेच हतबल बनल्याचे भाव निर्माण होत आहेत. आरोग्य विभागाने यासाठी १०४ क्रमांकावर मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. १०४ क्रमांकावर प्रामुख्याने करोना आजार व उपचाराविषयी प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही प्रमाणात दारु पिणारेही फोन करतात. नियमित भरपूर दारू पिणाऱ्यांमध्ये मनोविकाराची वेगवेगळी लक्षणे दिसतात. नागपूर येथील मनोरुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात काही तळीराम उपचारासाठी आले असले, तरी शासकीय मनोरुग्णालयात अजूनतरी फारसे मद्यपी उपचारासाठी आले नसल्याचे डॉ. साधना तायडे म्हणाल्या.

‘प्रामुख्याने ही तळीराम मंडळी खाजगी डॉक्टरांकडेच जाण्याला प्राधान्य देतील. तथापि लॉकडाऊनचे वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे परिणाम व त्यातून मानसिक आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली असून आशा तसेच आरोग्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मानसिक आजाराच्या लोकांना शोधून १०४ क्रमांकावर त्यांना मार्गदर्शन केले जाईल,’् असे डॉ. तायडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांच्या सहकार्याने आगामी काळात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल याचा आढावा घेऊन योग्य तयारीही केली जाईल, असेही डॉ. तायडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 11:13 am

Web Title: coronavirus in maharashtra lockdown in india alcohol addicted people went to doctor for prescription bmh 90
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 शेतकर्‍यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा – अजित पवार
2 लॉकडाउन : ५०० रुपये दंड आणि गाढवावरून धिंड; गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल
3 Coronavirus : उद्धव ठाकरेंनी अभिनेत्याला दिला शब्द; म्हणाले, ‘काळजी करू नका, त्वरित मदत केली जाईल
Just Now!
X