संदीप आचार्य

मुंबई : महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ४० लाख चाचण्या झाल्या असून, करोना रुग्णांची संख्या आता साडेसात लाख एवढी झाली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे करोना रुग्णांची संख्या गेला आठवडाभर सातत्याने वाढत असून, आज राज्यात १७ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे कालपर्यंत शहरी भागापुरता मर्यादित असलेला करोना आता ग्रामीण भागातही झपाट्याने पसरू लागला आहे.

करोनाच्या रुग्णांचा विचार करता मुंबई, ठाणे व पुणे जिल्हा वरच्या स्थानी आजही कायम असला, तरी आता कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद अमरावती जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्याचबरोबर चंद्रपुर, यवतमाळ व धुळे जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. राज्यात कालच्या (२९ ऑगस्ट) दिवशी तब्बल १६,८६७ रुग्ण आढळून आले असून, मुंबईत काल १४३२ करोना रुग्ण आढळून आले. पालघरसह ठाणे जिल्ह्यात ३८०५ रुग्ण, पुणे मंडळात ५२९२ रुग्ण, कोल्हापूर मंडळात १२९४, नाशिक मंडळात २९३८ तर नागपूर मंडळात १७७५ करोना रुग्ण आढळून आले आहेत. गडचिरोलीत आता करोना रुग्णांची संख्या ७०८ एवढी झाली आहे तर जळगाव, सातारा, कोल्हापूर शहर आदी ठिकाणी साडेतीनशे ते सातशे रुग्ण आढळून आले आहेत.

करोनाची साथ महाराष्ट्रात आली त्याला आता १७४ दिवस झाले असून, राज्यात करोना रुग्णांची संख्या सात लाख ५० हजार एवढी झाली आहे. यातील पाच लाख ५४ हजार रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ७२. ५८ टक्के एवढे असले तरी आजही १,८५,१३१ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे १४ हजार असलेली करोना रुग्णांची संख्या तीन हजाराने वाढून आज १७ हजारावर पोहोचली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही करोना आता पसरू पाहात असून मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत काही मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या दोन आठवड्यापूर्वी मुंबईत करोनाच्या रुग्णांची रोजची संख्या ही हजार ते तेराशेच्या दरम्यान होती. मात्र काल मुंबईत १४३२ रुग्ण आढळून आले. मुंबईतील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून करोनाची दुसरी लाट आली तरी त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने एमएमआरडीए, दहिसर, मुलुंड तसेच गोरेगाव येथे जम्बो रुग्ण व्यवस्था सज्ज ठेवली आहे. अशाच प्रकारची यंत्रणा आता ठाणे जिल्ह्यातही उभारण्यात येत आहे. पुण्यात रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयीन व्यवस्थापन यांचे प्रमाण आजही व्यस्त आहे. पुणे मंडळात आज करोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून १,६९,४४८ रुग्ण आजपर्यंत आढळून आले तर तब्बल ४०२१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह म्हणजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांचा विचार केला, तरी राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे मंडळात असून ही संख्या ४९,३६५ एवढी आहे. मुंबईत आजघडीला १९,९७१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ठाणे २०२६४, रायगड ५३३६,कोल्हापूर ६११९, सोलापूर ४३६३, नाशिक १०२९८, नागपूर ११,४३४ तर औरंगाबाद येथे ५८१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय उस्मानाबाद येथे ५६७२ तर अमरावती येथे ४९४९ रुग्ण उपचाराखाली दाखल आहेत. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा व धुळे येथे दोन हजार ते साडेतीन हजार करोना बाधित उपचाराअंतर्गत असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ग्रामीण भागात करोना रुग्ण वाढत असून जवळपास संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोनाच्या लढाईत उतरल्यामुळे लसीकरणापासून ते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत येणार्या वेगवेगळ्या आरोग्य उपक्रमावर त्याचा परिणाम होत असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी मान्य करतात.

लसीकरण, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, नसबंदी कार्यक्रम, तसेच आरोग्य विभागात होणारी बाळंतपण या सर्वांवर करोनाचा परिणाम झाला असून करोना बरोबरच पावसाळी आजाराचा सामना करणे हे मोठे आव्हान आरोग्य विभागा समोर असल्याचे सहसंचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. “यासाठी करोना रुग्ण शोधण्याबरोबर त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून संस्थात्मक तसेच घरी अलगीकरणावर भर देण्यात आला आहे. गावपातळीवर यापूर्वीच जनजागृती झाली असून बाहेरील लोकांना गावातील शाळा किंवा तत्सम ठिकाणी काही दिवस विलगीकरणात राहावे लागते,” असे डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. “प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून औषधांची कोणतीही कमतरता राहाणार नाही, याचीही काळजी घेतली आहे,” असे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.