मागील दोन महिन्यांपासून करोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण दुप्पटीचा कालावधीत मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी झाला असून, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

मुंबईत दरदिवशी करोनाचा संसर्ग झालेल्या दीड रुग्णांची नोंद होत आहे. त्यात मंगळवारी मोठी घट दिसून आली. मुंबईतील आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५० हजाराच्या पुढे गेला आहे. मंगळवारी १,०१५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या १ हजार ७५८ झाली आहे, तर ९०४ जण एकाच दिवसात करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत दररोज शेकडो लोकांना करोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत असताना आदित्य ठाकरे यांनी एक महत्त्वाची माहिती बुधवारी दिली. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. मुंबईतील रुग्णांचा डबलिंग रेटचा कालावधी वाढल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईचा डबलिंग रेट २४.५ दिवस इतका झाला आहे. राष्ट्रीय सरासरी १६ दिवस इतकी आहे. मुंबईत करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आदित्य यांनी म्हटलं आहे. मृत्यूदर कमी होऊन ३ टक्के इतका झाला असून राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आला आहे. मुंबईतील डिस्चार्ज रेट ४४ टक्के इतका असून, धारावीतील डबलिंग रेट ४२ दिवस इतका आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केला आहे.

मुंबईत दरदिवशी दीड हजार रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी १०१५ बाधित रुग्ण आढळून आले. तर ६९० संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी ५८ मृत झालेल्या ५८ रुग्णांमध्ये ४० पुरुष आणि १८ महिला होत्या. ४७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत मुंबईत २ लाख ३३ हजार ५७० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीचा सरासरी दर ३ टक्के आहे. मात्र पश्चिम उपनगरातील मालाड, दहिसर, कांदिवली या भागात रुग्णवाढीचा वेग ५ टक्के आहे. आतापर्यंत २२,९४२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.