रुग्ण दुपटीचा कालावधी पुन्हा वाढला

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या सोमवारी कमी नोंदवली गेली. ६४६ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या पंधरा ते वीस दिवसांनंतर पुन्हा एकदा  रुग्णसंख्या घटली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २०७ दिवसांवर गेला आहे.

सोमवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १३ पुरुष व ६ महिला होत्या. मृतांची एकूण संख्या १० हजार ८१० झाली आहे.

गेल्या ऑक्टोबरपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या घटू लागली होती. रुग्ण दुपटीचा कालावधी १८ नोव्हेंबरला ३२० दिवसांवर गेला होता. तर रुग्णवाढीचा दर ०.२२ टक्क्यापर्यंत खाली आला होता. मात्र दिवाळीनंतर पालिकेने चाचण्यांची संख्या वाढवली आणि त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. रुग्ण दुपटीचा कालावधी १९६ दिवसांपर्यंत खाली आला होता. तर रुग्ण वाढीचा दर ०.३५ टक्कय़ापर्यंत वाढला होता. मात्र सोमवारी परिस्थिती किंचित सुधारल्याचे चित्र होते. रुग्ण दुपटीचा कालावधी २०७ दिवसांपर्यंत वाढला तर रुग्णवाढीचा दरही ०.३४ टक्के झाला आहे.

एकूण रुग्ण संख्या २ लाख ८३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर एका दिवसात ७७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ५६ हजारांहून अधिक रुग्ण  करोनामुक्त झाले आहेत. सध्या १३,००८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात ३,८३७ जणांना संसर्ग

गेल्या २४ तासात राज्यात ३,८३७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, ८० जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ९०,५५७ झाली. सर्वाधिक १९,८६१ उपचाराधीन रुग्ण हे पुणे जिल्ह्य़ात आहेत. दिवसभरात नाशिक जिल्हा ३२२, नगर १३५, पुणे शहर १७९, पिंपरी-चिंचवड १५९, उर्वरित पुणे जिल्हा १८४, नागपूर शहर १७८ नवे रुग्ण आढळले.

ठाण्यात ४३१ नवे बाधित 

ठाणे : जिल्ह्य़ात सोमवारी ४३१ नव्या  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २ लाख २९ हजार १९ झाली आहे. तर, दिवसभरात ८ जणांचा  मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ५ हजार ६८५  झाली आहे. सोमवारी आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १६२, कल्याण-डोंबिवली शहरातील ८३, नवी मुंबईतील ७४, मीरा-भाईंदरमधील ४८, उल्हासनगरमधील २१,  बदलापूरमधील २०, अंबरनाथमधील १०, ठाणे ग्रामीणमधील ७ आणि भिवंडीतील ६ रुग्णांचा समावेश आहे.