20 October 2020

News Flash

Coronavirus : चार लाख मुंबईकर गृहविलगीकरणात

पाच दिवसांत ५३ हजारांहून अधिक करोना संशयितांची भर

करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ‘मिशन झिरो’ अभियानांतर्गत मुंबई आणि महानगर परिसरात प्रतिजन चाचण्यांवर भर दिला जात आहे.   (छाया - दीपक जोशी)

पाच दिवसांत ५३ हजारांहून अधिक करोना संशयितांची भर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणारी करोना रुग्णांची संख्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा मोठय़ा प्रमाणावर सुरू केलेला शोध, बाधित – संशयित रुग्णांबाबत धोरणात केलेले बदल आदी विविध कारणांमुळे घरातच विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील पाच दिवसांमध्ये गृहविलगीकरणात ठेवलेल्या संशयितांच्या संख्येत ५३ हजारांहून अधिक व्यक्तींची भर पडली असून गृहविलगीकरणातील लक्षण नसलेले, परंतु करोनाबाधित आणि संपर्कातील संशयित व्यक्तींची संख्या आजघडीला तब्बल चार लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

गेले काही दिवस मुंबईत दररोज दोन हजारांहून अधिक करोनाबाधितांची भर पडत आहेत. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी एका करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात ३० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.

मार्चपासून आजतागायत करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल २७ लाख २८ हजार ९४ व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी १० लाख ४१ हजार ०१९ अति जोखमीच्या, तर १६ लाख ८७ हजार ८८५ कमी जोखमीच्या गटातील आहेत. यापैकी २३ लाख ४० हजार ०३२ संशयितांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर १८ सप्टेंबर रोजी गृहविलगीकरणात ठेवलेल्या संशयित रुग्णांची संख्या तीन लाख ८६ हजार ५११ इतकी होती.

पाच दिवसांपूर्वी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी संशयितांची संख्या २६ लाख २७ हजार ४९४ इतकी होती. अवघ्या पाच दिवसांत मुंबईत तीन हजार २५७ रुग्ण सापडले आणि त्यांच्या संपर्कातील एक लाख एक हजार ४१० संशयितांचा पालिकेने शोध घेतला.

यापैकी ५३ हजार ५१४ जणांना अटीसापेक्ष गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. १९ आणि २० सप्टेंबर रोजीची आकडेवारी लक्षात घेता गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाढण्याचा अंदाज..

लक्षणे नसलेल्या, परंतु करोनाची बाधा झालेल्या रुग्णांना, त्याचबरोबर मोठे घर आणि स्वतंत्र प्रसाधनगृह असलेल्या करोनाबाधितांनाही घरीच विलगीकरणात राहण्याची अटीसापेक्ष परवानगी देण्यात येत आहे. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही अटीसापेक्ष घरीच विलगीकरणात राहण्याची मुभा दिली जाते. यामुळे गृहविलगीकरणातील व्यक्तींची संख्या नजीकच्या काळात आणखी वाढू शके ल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 1:04 am

Web Title: coronavirus in mumbai four lakh mumbaikars in home quarantine zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 शासकीय कार्यालयांतील १०० टक्के उपस्थितीविरोधात आज आंदोलन
2 धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा
3 प्रशांत दामलेंशी गप्पांचा योग
Just Now!
X