|| शैलजा तिवले, लोकसत्ता
करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या जवळपास एक टक्के रुग्णांचा मृत्यू पुढील काही दिवसांतच झाल्याचे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाने केलेल्या पाहणीतून निदर्शनास आले. त्यामुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पुढील काही दिवस संबंधित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी अधोरेखित केले.
‘बरे झाल्यानंतरही करोनाच्या दीर्घकालीन परिणामांमुळे रुग्णांच्या फुप्फुस, हृदयावर परिणाम होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होणे, पक्षाघाताचा झटका येणे इत्यादी आजार आढळल्याचे नोंदले आहे. तसेच यामुळे अचानक मृत्यू झाल्याचेही आढळले आहे. राज्यात असे जवळपास २ टक्के मृत्यू झाले आहेत. यासाठी आम्ही करोना पश्चातच्या तपासण्यांसाठी बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यावर भर दिला आणि हे विभाग आता बहुतांश ठिकाणी सुरू झाले आहेत’, असे राज्य करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
करोनामुक्त झाल्यावर ८७ टक्के रुग्णांना दोन ते तीन महिने दीर्घकालीन दुष्परिणाम दिसत होते, असे एका संशोधन अभ्यासात मांडले आहे. यात मानसिक ताणतणावाचाही समावेश असून वेळीच यांचे निदान आणि उपचार करून संभाव्य धोके टाळणे शक्य आहे. यासाठी रुग्णांनी बरे झाल्यावर काही महिने तरी तपासणीसाठी नियमितपणे जाणे गरजेचे असल्याचे मत डॉ. राहुल पंडित यांनी मांडले.
पाठपुराव्याचा अभाव
‘मुंबईत रुग्णांची संख्या अधिक होती. त्या काळात अगदी मोजके रुग्ण बरे होऊन घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचे आढळले. परंतु मृत्यू होण्यामागील कारणे, किती दिवसांत झाले, त्यांना अन्य काही लक्षणे आढळली होती का याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या नव्हत्या. तसेच करोनामुक्त झाल्याने यांची नोंदही करोनामध्ये झालेली नाही. त्यामुळे यांची स्वतंत्र नोंदही झाली नसल्याने ठोस आकडेवारी देता येणार नाही,’ असे पालिकेच्या विभागीय साहाय्यक आयुक्तांनी सांगितले.
बाह्य़ रुग्ण विभागाकडे पाठ
पालिकेने रुग्णालयात करोना पश्चात तपासण्यांसाठी बाह्य़रुग्ण विभाग सुरू केला असला तरी अनेक रुग्ण पाठपुरावा करूनही तपासणीसाठी येत नाहीत. काही जणांना पुन्हा लागण होण्याची भीती असते, तर काही रुग्णांना आता आपल्याला काही होणार नाही असेच वाटत असते. करोनाकाळात केवळ मुंबईतच नव्हे तर पनवेल, बदलापूर, रायगड येथूनही रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. रेल्वे उपलब्ध नसल्यानेही अनेक रुग्ण वेळेवर तपासणीसाठी येत नाहीत, असेही पालिका रुग्णालयांतील डॉक्टरांनी नोंदविले.
‘अधिक अभ्यासाची गरज’
‘करोनामुक्त झाल्यानंतर काही दिवसांनी अचानकपणे मृत्यू होण्यामागे हृदयविकार किंवा मेंदूशी संबंधित विकार कारणीभूत असतात. यातील बहुतांश रुग्णांना सहव्याधी असतात. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू करोनामुळेच झाला का, असे ठामपणे सांगणे शक्य नाही. यासंबंधी एकही संशोधन पेपर अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. तेव्हा याबाबत अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे,’ असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.
– लोकमान्य टिळक रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या सुमारे ९०० रुग्णांच्या प्रकृतीचा पाठपुरावा रुग्णालयातील करोना कृती दलाने घेतला.
– यात जवळपास एक टक्के रुग्णांचा घरी गेल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याचे आढळले.
– मृतांमध्ये बहुतांश रुग्ण ६० वर्षांवरील आणि इतर सहव्याधी असलेले होते.
– यातील जवळपास ३० टक्के रुग्णांचा मृत्यू हा पहिल्या १४ दिवसांमध्येच झाल्याचे नोंदले.
– मृतांपैकी अधिकतर रुग्णांना करोना असताना ऑक्सिजनवर ठेवले होते, अशी माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
– यासंबंधी संशोधन अभ्यासही वैद्यकीय नियतकालिकामध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 2:19 am