महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. रूग्णालयात दाखल होत त्यांनी स्वत: ट्विट करून यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर करोनाने राजभवनातही शिरकाव केला. दिवसेंदिवस राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असताना राजभवनातील जवळपास १८ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या कर्मचाऱ्यांनी करोनाची चाचणी केली होती. या चाचणी अहवाल मिळाल्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह निघाले. एएनआयने हे वृत्त दिलं. त्यानंतर रविवारी दुपारी राजभवन आणि आसपासच्या परिसरात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले.

राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. शनिवारी राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी १८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा चाचणी करण्यात येणार आहे.

करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे. “आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,” असं राज्यपालांनी ट्विट केलं आहे.