मुंबई : आतापर्यंत १० वर्षांखालील ११ हजारांहून अधिक मुलांना करोनाचा संसर्ग झाला असून १७ मुलांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती पालिकेतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.  करोना उपचारांतील गैरव्यवस्थापनाशी संबंधित याचिकांवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने लहान मुलांमधील संसर्गाकडे लक्ष वेधले. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार व पालिका त्यादृष्टीने काय उपाययोजना करत आहे अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर उत्तर देताना वरील माहिती पालिकेतर्फे अ‍ॅड्.अनिल साखरे यांनी दिली.