तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत, आरोग्य सुविधा कमी पडत असल्याने चिंता

मुंबई : राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे खाटा व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या असून स्थिती अशीच राहिली तर मृत्यू संख्याही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे  परिस्थितीवर नियंत्रणासाठी मर्यादित काळासाठी राज्यात टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध त्वरित  लावण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोना कृतीदलाच्या तातडीने बोलावलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यात करोनाची स्थिती गंभीर असून विविध योजना आखूनही अद्याप ती आटोक्यात आली नाही. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी करोना कृतीदलाची तातडीची बैठक घेतली. बैठकीला आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे,  करोना कृतीदलातील डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील करोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे खाटा व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला असून स्थिती नियंत्रणात आली नाही तर काही दिवसांनी या सुविधा सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी स्थिती आहे. सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटांपैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटांपैकी १२ हजार ७०१ खाटा , १९ हजार ९३० खाटांपैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटिलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना ठेवण्यात आले आहे.

काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच नाही. संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडते आहे, याकडे व्यास यांनी लक्ष वेधले. करोना नियमांचे पालन योग्यरितीने होत नसेल तर काही दिवसांसाठी टाळेबंदी लावून संसर्ग थोपवावा, या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली.

याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी लावावी लागल्यास धान्य पुरवठा, औषध, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश, मुख्य सचिवांना दिले. एकीकडे करोना काळातही अर्थव्यवस्था सुरु राहील यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी अनेक घटक अजूनही करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे लोकांनी करोना नियमांचे पालन करावे अन्यथा लोकांच्याआरोग्याचे संरक्षणासाठी टाळेबंदी लावावी लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

…तर मृत्यूची संख्या वाढणार

मागील वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते. मात्र आता २७ मार्च रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ३ हजार ४७५ तर मृत्यूसंख्या ५४ हजार ७३ इतकी झाली आहे. संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्यूही वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच गृहविलगीकरणात नियमांचे पालन न करणे ही  प्रमुख कारणे असू शकतात असे, कृती दलातील डॉक्टर्सनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

विदर्भात करोनाचे ९१ बळी, ६४ टक्के मृत्यू नागपुरातील

नागपूर : विदर्भात  दिवसभरात तब्बल ९१ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्यातील ६३.७३ टक्के मृत्यू आहेत. विदभात ७ हजार ४५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. नागपुरात ३७, ग्रामीण १८, जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला तर जिल्ह्यात ३ हजार ९७० नवीन रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह्यात ६  मृत्यू तर ३०६ नवीन रुग्ण आढळले. अमरावतीमध्ये ३  मृत्यू तर ३४८ नवीन रुग्ण आढळले. चंद्रपूरला ३ मृत्यू व ३४१ रुग्ण आढळले. गडचिरोलीत मृत्यू नाही. ५६ रुग्ण आढळले. यवतमाळला ९ मृत्यू व ४०० रुग्ण आढळले. वाशीमला २ मृत्यू व ३७७ रुग्ण आढळले. अकोल्यात ३ मृत्यू व ३७६ रुग्ण आढळले. भंडाऱ्यात २ मृत्यू तर ४३९ रुग्ण आढळले. गोंदियाला एकही मृत्यू नाही, १०७ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ५ मृत्यू तर ७३५ रुग्ण आढळले.

टाळेबंदीच्या निर्णयासाठी १ एप्रिलनंतर बैठक – टोपे

जालना : करोना प्रादुर्भावाची साखळी तोडावयाची असेल तर किमान १४ दिवसांची टाळेबंदी आवश्यक असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, केंद्राची पथके, जागतिक आरोग्य संघटना आणि राज्याच्या आरोग्य विभागाने शास्त्रीय पद्धतीनुसार हे मत व्यक्त केलेले आहे. राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह १ एप्रिलनंतर बैठक होणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे सांगितले. काही जिल्ह्यांत पाच, आठ, दहा दिवस  टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. परंतु शास्त्रीयदृष्ट्या करोनाची साखळी तोडण्यासाठी १४-१५ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो.  त्या संदर्भात आजच आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत, असेही टोपे म्हणाले.

राज्यातील चाचण्यांत सकारात्मकतेचे प्रमाण सर्वाधिक

दिल्ली : संपूर्ण देशात महाराष्ट्रातील करोना चाचण्यांमधील सकारात्मक अहवालाचे प्रमाण  अधिक असल्याचे आढळले आहे. देशभऱ्यात २४ कोटीहून अधिक संशयित रुग्णांची करोना चाचणी केली गेली. त्यात ५ टक्के  अहवाल सकारात्मक आले.  परंतु महाराष्ट्रात  हे प्रमाण २२.७८ टक्के आढळले आहे. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर के ले.  बंगळुरूमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासून १० वर्षाखालील ४७० मुलांना करोनाची बाधा झाली आहे. या शहरात एकीकडे संक्रमणाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे मुलांच्या घराबाहेरील विविध क्रियेत सहभाग वाढणे हे त्याचे एक कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. दरम्यान हळू- हळू काही वयोगटात शाळा सुरू होणेसह विविध कामातही मुलांचा वाढता सहभागही त्यांच्यातील संक्रमनाला जबाबदार आहे. पूर्वी टाळेबंदीमुळे मुले कमी बाधित होत असल्याचे चित्र होते. दरम्यान शनिवारी देशात करोनाचे ६२ हजार ७१४ नवीन रुग्ण नोंदवले गेले. ही रुग्ण संख्या यंदाच्या वर्षातील सर्वाधिक आहे. तर एकूण रुग्णांत सर्वाधिक ३५ हजार ७२६ बाधित महाराष्ट्रातील आहेत. छत्तीसगडमध्ये पंजाबच्या तुलनेत करोनाग्रस्तांची संख्याअधिक आहे. सध्या भारतात सक्रिय उपचाराधिन रुग्णांची संख्या ४.८६ लाख आहे. तर शनिवारी देशात ३१२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. ही २५ डिसेंबरनंतरची सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. महाराष्ट्रात शनिवारी १६६ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशाने सहा कोटी लसींचा टप्पा ओलांडला

देशात रविवारी सकाळी ७ वा.पर्यंत ६ कोटी २ लाख ६९ हजार ७८२ लसींची मात्रा दिली गेली. त्यात पहिली मात्रा दिलेले ८१ लाख ५२ हजार आरोग्य कर्मचारी, दुसरी मात्रा दिलेले ५१ लाख ७५ हजार ५९७ आरोग्य कर्मचारी, पहिली मात्रा दिलेले ८८ लाख ९० हजार ४६ पहिल्या फळीतील कर्मचारी, दुसरी मात्रा दिलेले ३६ लाख ५२ हजार ७४९ पहिल्या फळीचे कर्मचारी, ४५ हून अधिक वयाचे विविध आजार असलेल्या ६६ लाख ७३ हजार ६६२ व्यक्तींसह साठ वर्षाहून अधिक वयाच्या २ कोटी ७७ लाख २४ हजार ९२० व्यक्तींचा समावेश आहे.

राज्यात तब्बल ४० हजार रुग्णांची भर

राज्यात दिवसभऱ्यात करोनाचे तब्बल ४० हजार ४१४ नवीन रुग्ण आढळले तर १७ हजार ८७४ व्यक्ती करोनामुक्त झाले आहे. हा गेल्या काही महिन्यातील नवीन करोना बाधितांचा उच्चांक आहे. दिवसभऱ्यात राज्यात १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांमुळे आजपर्यंत करोना बाधितांची संख्या २७ लाख १३ हजार ८७५ रुग्णांवर पोहोचली असून त्यातील २३ लाख ३२ हजार ४५३ व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत.  आजपर्यंत करोनाचे ५४ हजार १८१ मृत्यू झाले. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण २ टक्के आहे.

महत्त्वाचे निर्णय

मर्यादित काळासाठी टाळेबंदी लावावी

मदत व पुनर्वसन सचिवांनी टाळेबंदीची कार्यपद्धती ठरवावी

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी

ऑक्सिजन  पुरवठा, ई आयसीयू, व्हेंटिलेटर्सची उपलब्धता

मनुष्यबळ वाढवण्यासाठी खासगी डॉक्टर्सची मदत

ऑक्सिजन, खाटांचे प्रमाण वाढवा

सध्या वाढती रुग्णसंख्या बघता सुविधा कमी पडतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली. व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

औरंगाबाद येथे १३ जणांचा मृत्यू : औरंगाबाद : करोनामुळे शनिवारी दुपारपासून ते रविवारी पहाटेपर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांधील तिघे हे चाळीसीच्या आतील व्यक्ती आहेत. उर्वरीत दहा जण हे ५५ ते ८५ वर्षांपर्यंतच्या व्यक्ती आहेत. दहा मृत हे औरंगाबाद शहरातील तर तिघे कन्नड, वैजापूर व वडोदबाजार येथील आहेत.