बाधितांसोबत सहकाऱ्यांना अलगीकरणाच्या सूचनांमुळे ताण

मुंबई : करोना निर्मूलनासाठी शासनाने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातही संसर्ग वाढू लागला आहे. बाधित अधिकारी, अंमलदारांसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना संशयित म्हणून अलगीकरणाच्या (क्वारंटाईन) सूचना दिल्या जात आहेत. या परिस्थितीमुळे पोलीस दलावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार २३ अधिकारी अंमलदार करोनाबाधित आहेत. यात मुंबईतील अधिकारी, अंमलदारांची संख्या जास्त आहे. राज्य रेल्वे दलात नेमणुकीस असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणारे शिपाई करोनाचे पोलीस दलातील पहिले लक्ष्य ठरले. कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या पोलीस शिपायाच्या संपर्कात आलेल्या २५ सहकाऱ्यांच्या चाचण्या के ल्या गेल्या. त्यापैकी काहींना दोन आठवडय़ांसाठी घरीच राहाण्याच्या सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर वरळीच्या पोलीस वसाहतीत वास्तव्य असलेल्या पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. पुढे बांगुरनगर, कु रार पोलीस ठाणे, विशेष शाखेत कार्यरत, भायखळा, नायगाव,  रफी अहमद किडवई मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदार बाधीत झाले. महापालिकेने बाधित पोलिसांचा वावर, जनसंपर्क लक्षात घेऊन पोलीस वसाहतींमधील इमारतीच्या इमारती प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केल्या.

खबरदारी घेत आहोत..

खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. मनुष्यबळाला  योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क आणि सॅनीटायझरचा पुरवठा प्रत्येक पोलीस ठाण्याला के ला जात आहे. याशिवाय बंदोबस्तावर असलेल्या मनुष्यबळाला दिवसातून किमान दोन वेळा र्निजतुक के ले जाईल यासाठी पाच विशेष वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील सुमारे ४० पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर औषध फवारणीची सुविधा किं वा वॉ वे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली. पोलीस दल अत्यावश्यक सेवेत मोडते. नागरिकांनी निर्बंध पाळावेत, सहकार्य करावे आणि पोलिसांवरील ताण कमी करावा. स्वत: सुरक्षित राहावे, समाजाला सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी के ले.