News Flash

मजुरांचा तांडा पुन्हा गावाकडे..

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे.

टाळेबंदीच्या भीतीने परराज्यांतील गाडय़ांसाठी झुंबड; मुंबई, ठाणे, पुणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

मुंबई, पुणे, ठाणे : मुंबईसह राज्यातील वाढती रूग्णसंख्या आणि पुन्हा टाळेबंदी होण्याच्या भीतीमुळे मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील, परगावातील नागरिकांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी सकाळपासून उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गर्दी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर स्थानकातही परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली. तर पुण्यातही हीच स्थिती आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहर आणि उपनगरांत करोना रुग्णांची संख्या मोठय़ा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान पुन्हा टाळेबंदीचे संकेत शुक्रवारी दिले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अनुभवाने धास्तावलेले कामगार, विद्यार्थी यांनी आपल्या मूळगावी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षित आसनांची क्षमता संपली..

अनेक गाडय़ांतील पुढील काही दिवसांची आरक्षित आसनांची क्षमता संपली असून यातून रोज ३५ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत. अनेकांनी शनिवारी आरक्षण न मिळाल्यामुळे पुन्हा कामाच्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला तर काहींनी पुढील काही दिवसांत मिळेल त्या दिवसाचे आरक्षण निश्चित केले. सीएसएमटी रेल्वे स्थानकात परराज्यात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे.

 

कामगारांना थांबवण्यासाठी प्रयत्न..

आमच्याकडील ३० टक्के कामगार परप्रांतीय आहेत. तर उर्वरित राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कामगार टाळेबंदी होणार आहे का, अशी विचारणा करत आहेत. त्याचबरोबर गावी जाण्यासाठी चाचपणी करत आहेत. मात्र सध्या टाळेबंदी होणार नाही, असे सांगून कामगारांना थांबवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहोत, अशी माहिती तारापूर येथील शिलाई कारखान्याचे मालक अंकुर गाडीया यांनी दिली.

सय्यद मुस्ताक यांचा गेल्या वर्षी रोजगार गेला. मागील वर्षभरापासून ते मिळेल ते काम करून गुजराण करत होते. आता मुंबईचा कंटाळा आल्याने त्यांनी सर्व सामान बांधून गावाची वाट धरली आहे. ‘आता मुंबईत काही काम उरले नाही. वर्षभर जमेल तसे भागवले. परंतु आता पुन्हा टाळेबंदी सुरू झाली तर येथे राहणे कठीण आहे. त्यामुळे पत्नीसह गावालाच कायमचे स्थायिक होणार,’ असे त्यांनी सांगितले.

टाळेबंदी लागण्याच्या भीतीने मोहित आणि त्याचे सात आठ मजूर मित्र उत्तरप्रदेशातील गावी निघाले होते. ‘रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या पाहून घरच्यांनाही काळजी वाटते. त्यात टाळेबंदी झाली आणि अडकून राहावे लागले तर याचीही भीती आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर मुंबईत परतणार, असे मोहित याने सांगितले.

उत्तर भारताकडे..

पुणे: पुण्यात पुढील सात दिवस सायंकाळनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारकडून पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे, लहान कं पन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, कामगारांनी शनिवारी रेल्वे व एसटी स्थानकांवर मूळगावी जाण्यासाठी गर्दी के ली होती. रेल्वेच्या सध्याच्या सर्व गाडय़ांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांना मागणी वाढली आहे. त्यामुळे विशेष आणि सणाच्या निमित्ताने सुरू के लेल्या अनेक गाडय़ांना मुदतवाढ देण्यात आली आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या भीतीने काही प्रमाणात कामगार, मजूरही मूळगावी परतू लागले आहेत. पुण्यात उपाहारगृह, मद्यालये, रेस्टॉरंट पूर्ण बंद के ल्याने या ठिकाणचे कामगारही परतत आहेत. एसटी आणि खासगी बसलाही काही प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील गाडय़ांना प्रवाशांकडून मागणी आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ

लोकमान्य टिळक टर्मिनसवर शनिवारी अचानक गर्दी वाढल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. ज्यांचे आरक्षण आहे, अथवा ज्यांना करायचे आहे, अशा एकाच व्यक्तीला टर्मिनस परिसरात प्रवेश देण्यात येत होता.

गाडय़ांची संख्या कमी..

उत्तर भारत आणि बिहार राज्यात राहणाऱ्या अनेक कामगारांनी शनिवारी सकाळीच लोकमान्य टिळक टर्मिनस गाठले. मात्र सध्या आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच स्थानकात प्रवेश मिळत असल्याने, मिळेल त्या गाडीचे अनेकांनी आरक्षण केले. पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रोज ३० ते ३५ गाडय़ा विविध राज्यांमध्ये जात होत्या. मात्र सध्या केवळ २० गाडय़ा लोकमान्य टिळक येथून सोडण्यात येत आहेत.

आधी जीव महत्त्वाचा, मग काम..

मुंबई : विविध व्यवसायांतील लोकांशी संवाद साधताना आधी जीव महत्त्वाचा, मग काम, अशी भूमिका मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून टाळेबंदीसृदश कठोर निर्बंधांचे सूतोवाच के ले. शनिवारी ठाकरे यांनी प्रसारमाध्यमे, व्यायामशाळा चालक, मराठी नाटय़ निर्माता संघ तसेच राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरचित्र संवाद साधला. – पान ८

देशात ८९१२९ बाधित

नवी दिल्ली : भारतात शनिवारी ८९१२९ करोना रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात गेल्या साडेसहा महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:37 am

Web Title: coronavirus infection worker lockdown in maharashtra akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आधी जीव महत्त्वाचा मग काम..
2 मुंबईत ८० टक्के खाटा भरलेल्या 
3 गृह विलगीकरण आता १७ दिवस
Just Now!
X