राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली असून ती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. करोनामुळे महाराष्ट्राची दिवसागणिक खालावणारी परिस्थिती पाहता हे उशिरा सुचणारे शहाणपण जनतेला परवडणारे नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० तुकड्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे. हे आधीही करता आले असते. करोनामुळे महाराष्ट्राची दिवसागणिक खालावणारी परिस्थिती पाहता, हे उशिरा सुचणारे शहाणपण जनतेला परवडणारे नाही.”.

कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली होती. “राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे ३२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमजान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे २००० पोलीस कर्मचारी म्हणजेच २० कंपन्या पाठवाव्यात,” अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली होती.