28 February 2021

News Flash

मुंबईत ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

संग्रहित

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “सुमारे ९५० हून अधिक करोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. करोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने करोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत”.

“आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठवले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“आयसीएमआरच्या गाइडलाईन्स डावलून महापालिकेच्या समितीने करोनामुळे झालेले मृत्यू हे करोनाचे नाहीत, असे दर्शविले होते. आता आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरवलेले करोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजे. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि करोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते करोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे करोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे करोनाचे मृत्यू करोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, “अशीही माहिती मिळाली आहे की, सुमारे ५०० अशी प्रकरणे आहेत, जी विविध रूग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. पारदर्शिता हा एकमेव मंत्र लोकांना सजग करण्याचा आहे. करोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता सुमारे ९५० वर मृत्यू हे मुंबईत कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्याची नोंद मात्र अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोना स्थितीची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, याची माहिती जनतेला द्यावी आणि असे गैरप्रकार करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 7:18 pm

Web Title: coronavirus lockdown bjp devendra fadanvis letter to cm uddhav thackeray over corona deaths in mumbai sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मंडळाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
3 सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?
Just Now!
X