माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली असून सांगतो ते करतो का, याचा ठाकरे सरकारकडून विचार आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ८० टक्के बेड्स केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना बेड मिळत नाही, ही वास्तविकता आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं.

आणखी वाचा- शिवसेनेच्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्यही नाही- फडणवीस

“मुंबईत १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांपैकी ५६ टक्के चाचण्या मुंबईत होत्या. ३१ मे रोजी ते प्रमाण २७ टक्क्यांवर आले. म्हणजे चाचण्या झाल्या पण, मुंबईबाहेर. मुंबईत सर्वाधिक रूग्ण आढळत असताना मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवायला हवी. ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. पण, खुल्या दिलाने ‘पुनश्च हरिओम’ पुढे न्यावे लागेल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपये मदत तोकडी ठरेल – देवेंद्र फडणवीस

“परीक्षा घेण्यातील अडचणी आणि न घेण्यातील धोके यातून सुयोग्य मार्ग काढावा लागेल. भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. आजची अवस्था ही केवळ पॉलिसी पॅरालिसिस नाही, तर अ‍ॅक्शन पॅरालिसिस सुद्धा आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.